पावसामुळे शाळा खोल्यांचे नुकसान होण्याचे प्रमाण वाढले असून सध्या बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 280 शाळा धोकादायक स्थितीत असल्यामुळे पालकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
गेल्या 2019 मध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर ते ऑक्टोबर 2022 पर्यंत जिल्ह्यातील शाळांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. परिणामी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात समस्या निर्माण झाली असून सध्या जिल्ह्यातील 280 शाळांमधील 604 खोल्यांची दुरुस्ती करणे गरजेचे बनले आहे.
शाळा धोकादायक बनल्याने विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी कांही शाळांचे स्थलांतर करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कांही शाळातील विद्यार्थ्यांना एक किंवा दोन वर्गात बसून शिक्षण उपलब्ध करून दिले जात आहे. शाळांची दुरुस्ती करावी अशी मागणी शाळा सुधारणा कमिटी व शिक्षकांनी शिक्षण खात्याकडे केली आहे.
मात्र शाळा खोल्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. कांही गावांमध्ये समुदाय भवन किंवा इतर ठिकाणी जागा उपलब्ध नसल्याने धोकादायक इमारतीतील शाळा दुसऱ्या ठिकाणी भरवण्यास अडचण येत आहे.
पावसामुळे सर्वाधिक नुकसान सौंदत्ती व कित्तूर तालुक्यातील शाळांचे झाले आहे. खानापूर तालुक्यातही कांही गावात शाळा कोसळल्या आहेत. बेळगाव शहरातील 30 शाळांमधील 80 खोल्या तर ग्रामीणमधील 46 शाळांमधील 51 खोल्यांची दुरुस्ती आवश्यक आहे.
त्याचप्रमाणे खानापूर तालुक्यातील 25 शाळांमध्ये 54 खोल्या धोकादायक स्थितीत आहेत. दरम्यान, दरवर्षी पावसामुळे शाळा खोल्यांचे नुकसान होत असल्याने अडचण निर्माण होत आहे.
सध्या ज्या शाळा खोल्यांची तातडीने दुरुस्ती आवश्यक आहे अशा शाळांची माहिती जिल्हा प्रशासनाला दिली आहे विविध योजना अंतर्गत शाळा खोल्या बांधण्यासाठी निधी मंजूर होत आहे. त्यामुळे लवकरच बांधकामाचे काम हाती घेतले जाईल, अशी माहिती जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड यांनी दिली आहे.