सकाळी फिरावयास जाणाऱ्यांनी दिलेल्या माहितीची तात्काळ दखल घेत अग्निशामक दलाच्या जवानांनी झाडावर पतंगाच्या मांजात अडकलेल्या एका घुबडाला जीवदान देण्याची घटना सकाळी घडली.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, शहापूर छ. शिवाजी उद्यान येथे नेहमीप्रमाणे सकाळी फिरावयास जाणाऱ्या मंडळींना आज उद्यानातील एका नारळाच्या झाडावर पतंगाच्या मांज्यात अडकून एक पूर्ण वाढ झालेले मोठे घुबड लटकत असलेले पहावयास मिळाले. बहुदा रात्रभर माझ्यातून सुटका होण्यासाठी धडपडून थकलेले ते असहाय्य घुबड सकाळी अधून मधून पुन्हा सुटकेसाठी केविलवाणी धडपडत करत होते.
याबाबतची माहिती उद्यानात फिरावयास आलेल्या पैकी काहींनी अग्निशामक दलाला कळविली सदर माहिती मिळताच बेळगाव अग्निशामक दलाचे अधिकारी टक्केकर यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशामक जवानांनी छ. शिवाजी उद्यान येथे धाव घेतली.
तसेच लांब काठीच्या सहाय्याने नारळाच्या झाडाच्या फांदीवर पतंगाच्या मांज्यात अडकून लटकत असलेल्या त्या घुबडाची मांजाच्या जीवघेण्या गुंत्यातून सुरक्षित सुटका केली. यावेळी बघायची गर्दी झाली होती. मांजामुळे जखमी झालेल्या त्या घुबडाला उपचार करून पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी वन खात्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे.