हलगा येथील सुवर्ण विधान सौधच्या मागील बाजूस शेती असलेल्या शेतकऱ्यांच्या सोयीसाठी असलेल्या सर्व्हिस रोडवर विरोध असतानाही सध्या तारेचे कुंपण मारण्याची तयारी सुरू झाल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत असून हा प्रकार त्वरित थांबवावा अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
हलगा येथील सुवर्ण विधान सौधच्या मागील बाजूस शेती असलेल्या शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सर्व्हिस रोड करण्यात आला आहे. आपल्या शेतापर्यंत ट्रॅक्टर बैलगाड्या वगैरे घेऊन जाण्यासाठी शेतकऱ्यांसाठी हा रस्ता अतिशय अनुकूल ठरतो. मात्र सध्या या रस्त्या शेजारी तारेचे कुंपण मारण्यासाठी लोखंडी खांब (पोल) उभे केले जात आहेत.
बहुदा राज्य सरकारच्या आगामी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार केला जात असला तरी यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण होणार आहे. यापूर्वी देखील सदर सर्व्हिस रोडवर तारेचे कुंपण घालून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यापासूनचा मार्ग अडविण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र हलगा -बस्तवाड येथील शेतकऱ्यांनी त्या विरोधात जोरदार आवाज उठवून सर्व्हिस रोड वरून शेतात जाण्याचा मार्ग बंद करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न हाणून पाडला होता.
तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यावेळी हलगा -बस्तवाडच्या शेतकऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा करून सदर सर्व्हिस रोड सुवर्ण विधान सौधच्या मागील बाजूस शेतजमिनी असलेल्या शेतकऱ्यांसाठी किती अत्यावश्यक आहे हे पटवून दिले होते. त्यामुळे या रस्त्यावर तारेचे कुंपण घालण्याची योजना रद्द करण्यात आली होती.
मात्र आता पुन्हा हे कुंपण घालण्याची तयारी करण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांनी त्याला तीव्र विरोध दर्शविला असून कुंपण घालण्याचे काम त्वरित थांबवावे अशी जोरदार मागणी केली आहे.