सुपीक जमिनीतून कित्तूर मार्गे उभारण्यात येणाऱ्या नियोजित बेळगाव -धारवाड रेल्वे मार्गाला आक्षेप नोंदवण्याच्या मुदतीत तीव्र विरोध करण्याबरोबरच प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय गर्लगुंजी (ता. जि. बेळगाव) गावातील शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
धारवाड ते बेळगाव व्हाया कित्तूर मार्गे होणाऱ्या रेल्वे मार्गासाठी जमीन अधिग्रहणाच्या प्राथमिक नोटिसा दिलेल्या आहेत. आक्षेप नोंदवण्यासाठी 30 दिवसाचा कालावधी आहे. त्यासाठी गर्लगुंजी गावातील शेतकऱ्यांनी प्राथमिक बैठक घेऊन भूसंपादनाला विरोध दर्शविला.
त्याचप्रमाणे लवकरच केआयएडी यांच्याकडे आक्षेप नोंदवून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. सुपीक जमिनीतून जाणाऱ्या या रेल्वे मार्गाला शेतकऱ्याचा विरोध राहील. या मार्गाद्वारे अंतर वाढणार असल्यामुळे सरकारचे जास्त पैसे खर्च होणार आहेत. गर्लगुंजी, नंदीहळ्ळी, नागेनहट्टी, केके कोप्प गावच्या शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून सुपीक जमिनीतून रेल्वे मार्ग घेण्यास विरोध केला आहे. त्यानंतर रेल्वे विभागाने परत 2 वेळा सर्वेक्षण केलेले आहे.
सदर रेल्वे मार्ग चुकीची नापीक जमिनीतून न्यावा त्यामुळे अंतर सुद्धा कमी होते आणि कमी खर्चात हा प्रकल्प होऊ शकतो. तशा आशयाचा ठरावही पाच ग्रामपंचायतींनी रेल्वे विभाग जिल्हाधिकारी, रेल्वे मंत्री आणि मुख्यमंत्री याना पाठविला आहे. त्या अनुषंगाने 80 टक्के काम पूर्ण झाल्याचे पत्र सुद्धा रेल्वे बोर्डकडून शेतकऱ्यांना मिळाले आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
तसेच खासदार मंगल सुरेश अंगडी यांनी रेल्वेच्या विभागीय बैठकीत स्वतः पत्र देत पूर्वीच्याच सुपीक जमिनीतून नियोजित रेल्वे मार्ग करावा असे बजावले आहे. माहिती हक्क अधिकारा खाली शेतकऱ्यांना ही माहिती मिळाली असल्यामुळे शेतकऱ्यांनी बैठकीत तीव्र संताप व्यक्त केला. सुपीक जमिनीतील रेल्वे मार्ग रद्द करावा यासाठी प्रसाद पाटील गर्लगुंजी आणि इतर शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
सदर खटला सध्या न्यायालयात प्रलंबित असताना शेतकऱ्यांना प्राथमिक नोटीस देण्यात आल्या आहेत. त्यामुळे राजकीय व्यक्तींच्या दबावाखाली हे सर्व घडतंय असा आरोप शेतकऱ्यांनी केला.
मात्र कोणत्याही परिस्थितीत बेळगाव -धारवाड रेल्वे मार्ग सुपीक जमिनीतून होऊ द्यायचा नाही. वेळ आल्यास प्रसंगी उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी यावेळी दिला. गावातील समस्त शेतकरी बांधव बैठकीला उपस्थित होते.