बेळगाव शहरात जुलूस-ईद-ए-मिलाद उन नबी निमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. बेळगाव शहरात ईद मिलाद निमित्त बारा इमाम अंजुम कमिटीच्यावतीने भव्य जुलूस म्हणजेच शोभायात्रा काढून विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी ईद-ए-मिलाद निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना मौलवी म्हणाले , नमाज हा इस्लामचा पाया आहे. सर्व मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केल्यास जगात शांतता नांदेल. मुस्लिम हा पवित्र धर्म आहे. यामुळे प्रत्येकाने कष्ट करून चांगले जीवन जगण्याचा सल्ला त्यांनी दिला. यावेळी मुफ्ती मंजूर आलम यांनी ईद सण साजरा करण्यामागील इतिहास सांगितला.
यावेळी बोलताना माजी आमदार फिरोज सेठ म्हणाले की, बेळगाव शहरात ईद मिलाद निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुस्लिम बांधवांसह इतर समाजबांधवाही सहभागी झाले आहेत, हि चांगली बाब आहे. आम्ही मशिदीत पाचवेळा प्रार्थना करतो. आमच्या मशिदींना हिंदू मित्रांनीही भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
शहर पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या म्हणाले, गेल्या १२ दिवसांपासून हा कार्यक्रम शहरात उत्साहात साजरा केला जात आहे. यासाठी पोलीस विभागाकडून शहरात आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली आहे. यावेळी पोलीस आयुक्तांनी सर्व सण आणि उत्सव शांततेत साजरे करण्याचेही आवाहन केले. तसेच डीसीपी रवींद्र गडादी यांनीही मनोगत व्यक्त केले. कोणताही धार्मिक सण अत्यंत शिस्तीने साजरा करावा असे आवाहन करत त्यांनी सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमानंतर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी ध्वजारोहण करून मिरवणुकीचे उदघाटन केले. त्यानंतर धर्मगुरूंना रथात बसवून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमासाठी उत्तर प्रदेशमधून हजरत सय्यद काशीम अश्रफ, जिलानी उर्फ बाबा-ए-मिल्लत किचोचा, शहर पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, डीसीपी रवींद्र गडादी, सर्व एसीपी, अंजुमन संस्थेचे अध्यक्ष राजू सेठ, बेळगाव शहर देवस्थान समितीचे अध्यक्ष रणजीत चव्हाण-पाटील, सामाजिक कार्यकर्ते विकास कलघटगी, रमेश कळसन्नवर, बाबूलाल राजपुरोहित आदींचा सहभाग होता. सीरत कमिटीचे बागवान, सय्यद बुखारी, मुस्ताक शेख, अल्ताफ कागझी, रियाज शेख, अनीस मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते.