सासनकाठी व पालख्यांच्या सवाद्य जल्लोषी मिरवणुकीसह ऐतिहासिक परंपरा लाभलेला बेळगावातील सिमोल्लंघनाचा कार्यक्रम आज बुधवारी विजयादशमी दिवशी लक्षणीय गर्दीत अभूतपूर्व उत्साहात पार पडला.
कोरोनामुळे गेली दोन वर्ष विजयादशमी दसऱ्या दिवशी होणारा सिमोल्लंघन कार्यक्रम साधेपणाने करण्यात आला होता. मात्र यंदा कोरोनाचे कोणतेही निर्बंध नसल्यामुळे सिमोल्लंघनाची मोठी जय्यत तयारी करण्यात आली होती. आज विजयादशमी दिवशी सायंकाळी सिमोल्लंघनासाठी शहरातील जुन्या प्रमुख 18 गल्ल्यांसह विस्तारित भागातील हजारो नागरिक ज्योती कॉलेज मैदानावर एकवटले होते.
परंपरेनुसार दुपारी आमदार ॲड. अनिल बेनके आणि पंचमंडळींच्या उपस्थितीत चव्हाट गल्ली येथील देवदादा सासनकाठी व मानाची झूल घातलेला जोतिबा देवाचा नंदी (कटल्या) यांचे पूजन व आरती झाल्यानंतर त्यांनी सवाद्य मिरवणुकीने सिमोल्लंघन मैदानाकडे प्रस्थान केले. या पद्धतीने सिमोल्लंघनाच्या मुख्य मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर श्री मारुती देवाची पालखी मिरवणुकीत सहभागी झाली. त्यानंतर सासनकाठी व नंदी बसवान गल्लीत गेल्यानंतर श्री बसवण्णा देवाचे वाहन आणि त्या मागोमाग मारुती गल्लीतील श्री मारुती मंदिरातील देवाचे वाहन मिरवणुकीत सहभागी झाले. पालख्यांची ही भव्य मिरवणूक मग वाजत गाजत सायंकाळी ज्योती कॉलेज मैदान अर्थात शिलंगण मैदानावर पोहोचली. मिरवणुकीच्या अग्रभागी असलेला मानाची झूल पांघरलेला आणि दोन्ही बाजूला ढोल बांधलेला नंदी साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता.
कोरोना नंतर दोन वर्षांनी सिम्मील्लंघनासाठी असे गर्दीने फुलले होते मराठी विद्यानिकेतन शाळेचे मैदान त्यांची चित्रमय झलक
फोटो सौजन्य:D B Patil #बेळगावदसरा2022
##सीमोल्लंघन2022 pic.twitter.com/RbdyL5cpWz— Belgaumlive (@belgaumlive) October 5, 2022
दरम्यान, तोपर्यंत श्री कपिलेश्वर मंदिर श्री मातंगी मंदिर श्री समादेवी मंदिर व नार्वेकर गल्लीतील श्री ज्योतिबा मंदिराच्या पालख्याही शिलंगणावर पोहोचल्या. सासनकाठी आणि पालख्यांसोबत असंख्य भाविक ज्योती मैदानावर दाखल झाले. त्या ठिकाणी मैदानावर आपट्याच्या फांद्यांचे रिंगण करण्यात आले होते.
परंपरेनुसार या रिंगणातील शस्त्रांचे पूजन वतनदार चव्हाण पाटील घराण्यातर्फे शहर देवस्थान मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक रणजीत चव्हाण -पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जिल्हाधिकारी नितेश पाटील,पोलीस आयुक्त डॉ एम बी बोर्लिंगय्या आदी मान्यवर उपस्थित होते. शस्त्र पुजेनंतर त्यानंतर पारंपरिक रिंगण सोहळा पार पडला.
घोड्यांचे रिंगण हे जसे आषाढी वारीचे वैशिष्ट्य असते तसेच वैशिष्ट्य बेळगावच्या सिमोल्लंघनातील कटल्या बैलाच्या रिंगणाचे आहे. बेळगावचा कटल्या या शब्दाचा अर्थ ‘शिवाचा नंदी’ असा घेतला जातो. या कटल्याचा रिंगण सोहळा उत्साहात पार पडल्यानंतर कटल्याने आपट्याच्या पानांची रास आपली शिंगे जमिनीत घुसवून विस्कटली. त्यानंतर कटल्याने शिंगाने उघडलेली माती आणि विस्कटलेली आपट्याची पाने एकमेकांना देत ‘सोने घ्या सोन्यासारखे रहा’ असा संदेश देत उपस्थित सर्वांनी एकमेकांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आणि सोने लुटण्याचा कार्यक्रम सुरू झाला.
कोरोनामुळे दोन वर्षानंतर मुक्त वातावरणात सिमोल्लंघन कार्यक्रम होत असल्यामुळे तसेच हा कार्यक्रम म्हणजे एक पर्वणीच असल्यामुळे आज दुपारनंतर ज्योती कॉलेज मैदानावर सोने लुटण्यासाठी नागरिकांची गर्दी होण्यास सुरुवात होऊन सायंकाळी परिसर गर्दीने फुलून गेल्यामुळे मैदानाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. शहरातील सिमोल्लंघन ज्योती कॉलेज मैदानावर पार पडले तर वडगाव, जुने बेळगाव, शहापूर, खासबाग व अनगोळ मधील लोकांचा सिमोल्लंघनाचा कार्यक्रम घुमटमाळ मैदानावर पार पडला.
कोरोना नंतर दोन वर्षांनी सिम्मील्लंघनासाठी असे गर्दीने फुलले होते मराठी विद्यानिकेतन शाळेचे मैदान त्यांची चित्रमय झलक
फोटो सौजन्य:D B Patil #बेळगावदसरा2022
##सीमोल्लंघन2022 pic.twitter.com/RbdyL5cpWz— Belgaumlive (@belgaumlive) October 5, 2022