एअरलाइन्स अर्थात विमान कंपन्यांचे हिवाळी मोसमाचे वेळापत्रक उद्या रविवार दि. 30 ऑक्टोबर 2022 पासून अंमलात आणले जाणार असून त्यामध्ये बेळगावसाठी चांगल्या पेक्षा वाईट बातमी जास्त आहे.
चांगली बातमी म्हणजे इंडिगो बेळगाव -बेंगलोर अतिरिक्त विमान सेवा सुरू करत आहे, तर वाईट बातमी ही की आपल्या सुधारित वेळापत्रकानुसार स्पाइस जेटची दिल्ली विमानसेवा आठवड्यातून फक्त तीन दिवस असणार आहे.
हिवाळी वेळापत्रकानुसार स्पाइस जेट 472 विमान फक्त मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी दिल्लीची वारी करेल. आणखी एक वाईट बातमी म्हणजे अलाईन्स एअरने आपली पुणे विमान सेवा अनिश्चित कालावधीसाठी बंद केली आहे.
अलीकडेच या कंपनीची बेंगलोर विमान सेवा देखील बंद करण्यात आली आहे. ट्रू जेटने सर्व मार्गांवरील आपली सेवा बंद केली असल्यामुळे त्यांची तिरुपती येथील विमानसेवा फार पूर्वीच बंद झाली आहे. स्टार एअरने आपली बेंगलोर विमान सेवा बंद केली असल्यामुळे बेंगलोरसाठी आता फक्त इंडिगोच्या दोन विमान सेवा सुरू आहेत.
बेळगाव विमानतळावरून उपलब्ध असणाऱ्या विमानसेवा पुढील प्रमाणे आहेत. इंडिगो : बेंगलोरसाठी दररोज दोन विमान सेवा, हैदराबादसाठी दररोज एक विमानसेवा. स्पाइस जेट : दिल्लीसाठी मंगळवार, गुरुवार, शनिवारी विमानसेवा.
स्टार एअर : मुंबईसाठी मंगळवार, बुधवार, गुरुवार व शनिवारी विमानसेवा. अहमदाबादसाठी सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार व शनिवारी भूज मार्गे विमानसेवा. इंदोरसाठी मंगळवार व रविवारी अजमेर मार्गे विमानसेवा.
सुरतसाठी सोमवार, बुधवार व शुक्रवारी विमानसेवा. नासिकसाठी शुक्रवारी व रविवारी विमानसेवा. जोधपुरसाठी मंगळवार, गुरुवार व रविवारी विमानसेवा. तिरुपतीसाठी सोमवार व शुक्रवारी विमानसेवा तसेच नागपूरसाठी मंगळवार व शनिवारी विमानसेवा.