केंद्राने नुकतीच 5-जी इंटरनेटची घोषणा केली असून आता या माध्यमातून फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगारांची हालचाल सुरु झाली आहे.
एखादी तांत्रिक बाब शासनाने पुढे आणली कि त्याद्वारे जनतेची कशापद्धतीने फसवणूक करता येईल याचा विचार सायबर गुन्हेगारांकडून नेहमीच होत असतो. अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलीस विभागातर्फे करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5-जी इंटरनेट सेवेची घोषणा पंधरा दिवसांपूर्वी केली असून भविष्यात लवकरच 4-जी मोबाईल 5-जी होणार आहेत. हि बाब सरबत क्राईम गुन्हेगारांनी हेरून जनतेच्या नव्या पद्धतीच्या फसवणुकीची पद्धत शोधून काढली आहे. 5-जी मोबाईल सिमकार्ड सर्व्हिस देखील सुरु झाली असून याचा गैरफायदा घेत काही भामट्यांकडून फोन करून ओटीपी विचारण्याचा प्रकार सुरु झाला आहे.
यामुळे कोणत्याही अनोळखी कॉलवर विश्वास ठेवून आपल्या मोबाईलवर आलेला ओटीपी देऊ नये, यामुळे आपली आर्थिक फसवणूक होऊ शकते, आपल्या बँकेतील रक्कम गायब होऊ शकते हि बाब लक्षात ठेवून सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
5-जी सिमकार्ड कंपनीतच मिळणार असून आपल्याला कंपनी कार्यालयात जाऊनच सिमकार्ड घ्यावे लागणार आहे. याशिवाय अन्य काही माहिती हवी असल्यास संबंधित मोबाईल कंपनीमध्ये जाऊन खात्री करून घ्यावी, मात्र अनोळखी व्यक्तीने कोणत्याही गोष्टीसाठी केलेल्या फोनकॉलवर विश्वास ठेवू नये, फोनला प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन पोलीस खात्याने केले आहे. अद्याप फसवणुकीचा प्रकार समोर आला नसून जनजागृतीच्या उद्देशाने पोलीस आयुक्तालयाकडून जनजागृती करण्यात येत आहे.