अज्ञात हल्लेखोरांनी तीक्ष्ण प्राणघातक शस्त्रानी वार करून एका युवकाचा निर्घृण खून केल्याची घटना शहरानजीकच्या हत्तरगी येथे उघडकीस आली आहे.
विनायक सोमशेखर होरकेरी (वय 28) असे खून झालेल्या युवकाचे नांव असून तो यमकनमर्डी गावचा रहिवासी होता. आपल्या मोटरसायकल वरून विनायक आपल्या गावाकडे निघाला असता अज्ञातांनी पाठीमागून येऊन त्याच्यावर हल्ला करण्याद्वारे तीक्ष्ण हत्यारानी त्याचा खून केला.
प्राणघातक वार वर्मी बसल्यामुळे रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या विनायक याचा अतिरक्तस्त्रावामुळे जागीच मृत्यू झाला. विनायक याच्यावर हल्ला करून हल्लेखोर घटनास्थळावरून लागलीच फरारी झाले.
गेल्या शनिवारी आपला वाढदिवस साजरा करणाऱ्या विनायक याचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे यमकनमर्डी गावात हळहळ व्यक्त होत आहे. सदर खून प्रकरणी यमकनमर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.