Friday, March 29, 2024

/

नागरिकांच्या जीवाशी होणारा खेळ कधी थांबेल?

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष: बेळगाव शहरात अपुऱ्या बससेवेचा फटका कित्येक नागरिकांना बसत असून बसमधून जीवघेणा प्रवास करत नागरिक आणि विद्यार्थ्यांची फरफट होत आहे. शहरात तसेच ग्रामीण भागात धावणाऱ्या बसेसची संख्या कमी असल्याने बसप्रवास करणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांनाही बसमधून तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. शहरातील चन्नम्मा चौक, यंदेखूट परिसर, युनियन जिमखान्याजवळील परिसर, धर्मवीर संभाजी चौक अशा अनेक ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. शेकडो विद्यार्थी घरी जाण्यासाठी बसची वाट पाहात बसथांब्यावर ताटकळत उभे असतात. सायंकाळच्या वेळेत हि गर्दी अधिक असते. दरम्यान बसथांब्यावर येणाऱ्या बसदेखील कधी थांबविल्या जातात तर कधी गर्दीमुळे तशाच पुढे घेऊन गेल्या जातात. अशावेळी विद्यार्थी धावत बसमध्ये चढत असल्याचा प्रकारही निदर्शनास आला आहे. यासंदर्भात परिवहन अधिकाऱ्यांच्या निदर्शनात हि बाब आणून देऊनही याकडे दुर्लक्ष होत आहे.

बेळगाव शहराचा विकास झपाट्याने होत असल्याचा केवळ आभासच निर्माण करण्यात आला आहे. नागरी सुविधांच्या नावाने बोंब असणाऱ्या बेळगावमधील विकास हा वरकरणी विकास आहे. अनेक रस्त्यांचे सौंदर्यीकरण, जनतेच्या पैशाचा चुराडा करून विकासाच्या नावाची भुलथाप आता हळूहळू प्रत्येकाच्या निदर्शनात येत आहे. याच बेळगाव शहरातील परिवहन सेवेचा बोजवारा उडाल्याचीही अनेक वृत्त आजपर्यंत आपण पहिली आहेत. अनेक दुर्गम भागात आजही बससेवा उपलब्ध नसल्याने नागरिकांची आणि प्रामुख्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

राजकारणात , निवडणुकीच्या तयारीत व्यस्त असलेल्या लोकप्रतिनिधींना साध्या आणि महत्वाच्या सुविधांअभावी होत असलेले नागरिकांचे हाल कधीच नजरेसमोर दिसत नाहीत. वाहतूक सेवा सुरळीत करण्यासाठी नागरिकांना निवेदनाचा भडीमार करावा लागतो. परंतु इतका सारा आटापिटा करूनही अशा असुविधांकडे दुर्लक्षच केले जाते.

 belgaum

बेळगावची रहदारी दिवसागणिक वाढत चालली आहे. अशातच दोन वर्षे कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा सुरळीतपणे सुरु झाल्या असून विद्यार्थ्यांची अधिक गर्दी होत आहे. त्याचप्रमाणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्याही वाढली आहे. वेळेत बस न मिळाल्याने काहींना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. ग्रामीण भागातून शहरात येऊन आपल्या उदरनिर्वाहासाठी, कामाच्या निमित्ताने, शाळा – महाविद्यालयासाठी अशा विविध कारणास्तव दररोज हजारो प्रवासी बसमधून प्रवास करतात. नोकरी करणारे असो किंवा शाळेतील मुलं अशी अनेक मंडळी प्रवासासाठी बस प्रवासाचा वापर करतात.

परंतु अशावेळी अनेकदा बसच्या दरवाजात लटकत प्रवास करत असलेले चित्र आपल्याला दिसून येते. सध्या बेळगावमध्ये अनेक ठिकाणी परिवहनच्या बसमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांना, विद्यार्थ्यांना हा अनुभव येत आहे. अनेक मार्गावरून रिकाम्या बस फिरताना दिसत आहेत तर काही ठिकाणी प्रवाशांना तासनतास प्रतीक्षेत ताटकळत थांबावे लागत आहे.Bus

सकाळच्या घाईगडबडीत बसमधून प्रवास करणारा प्रत्येकजण बस मिळावी यासाठी धावपळीने येतो. मात्र अनेकवेळा बस बसस्थानकावर न थांबता स्थानकापेक्षा पुढे जाऊन थांबते किंवा प्रवासी बसमध्ये चढण्याआधीच पुढे जाते. यादरम्यान कित्येक नागरिक, विद्यार्थी बसच्या मागे धावताना दिसून येतात तर काही नागरिक बसच्या दारात उभे असलेले पाहायला मिळतात.

बेळगावमध्ये हल्ली अपघातांची संख्या वाढत चालली असून यादृष्टीने प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेची काळजी घेणे हे बस चालक आणि वाहकाचे कर्तव्य आहे. याचप्रमाणे परिवहन मंडळाने बसच्या संख्याही वाढविणे गरजेचे असून शहराबरोबरच ग्रामीण भागातील बसफेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.