गुरुवारी (दि. १) दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव -वेंगुर्ला मार्गावरील कुद्रेमानी फाट्यानजीक रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाल्याची घटना आज सायंकाळी घडली. वैजनाथ डोंगरातून जोराने पाणी आल्याने रस्ता पाण्याखाली गेला होता.
बेळगाव शहरासह तालुक्यात आज दुपारनंतर पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आसपासच्या ओढ्यानाल्यांना पूर येऊन वेंगुर्ला रोडवरील कुद्रेमानी फाट्यानजीकचा रस्तावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहण्यास सुरुवात झाली.
यामुळे जवळपास 30 -40 मीटर अंतराचा रस्ता संपूर्णपणे पाण्याखाली गेला होता. रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याच्या जोरदार प्रवाहातून वाहने हाकणे धोक्याचे असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक आज सायंकाळी बराच काळ ठप्प झाली होती.
काही धाडसी वाहन चालक जीवावर उदार होऊन रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यातून आपली वाहने कशीबशी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला नेताना दिसत होते. वाहतूक ठप्प झाल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांची एकच गर्दी झाली होती.
या ठिकाणाहून नाला वाहतो. पण, जोराने पाणी आल्यामुळे नाल्यावरील पाणी मुख्य रस्त्यावर आले होते. तासाभरानंतर पाणी ओसरले असून वाहतूक सुरळीत झाली.