राज्याच्या आरोग्य व कुटुंब कल्याण खात्यामार्फत ‘माय क्लिनिक’ अर्थात माझा दवाखाना ही योजना हाती घेण्यात आली असून या योजनेअंतर्गत येत्या ऑक्टोबर महिन्यात बेळगाव जिल्ह्यात 21 दवाखान्यांची स्थापना करण्यात येणार आहे.
आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याच्या माय क्लिनिक योजनेअंतर्गत सध्या राज्यातील 438 ठिकाणी वैद्यकीय सेवा सुरू आहे. आता पुढील महिन्यात बेंगलोरला बीबीएमपी कार्यक्षेत्रात 243 तर राज्याच्या इतर भागांमध्ये 195 दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत. त्यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील 21 दवाखान्यांचा समावेश आहे. माय क्लिनिकमध्ये 12 सेवा दिल्या जाणार असून या योजनेसाठी 155 कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे.
शहरातील झोपडपट्टी आणि गरीब लोकांना फायदा व्हावा यासाठी हे क्लिनिक सुरू करण्यात येत आहे. क्लिनिकमध्ये डॉक्टरांची उणीव भासू नये या उद्देशाने 4 हजार डॉक्टरांची त्याचप्रमाणे आवश्यक प्रमाणात सहाय्यक वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या ठिकाणी सेवा बजावणारे डॉक्टर कंत्राटी पद्धतीने काम करतील.
प्राथमिक स्तरावर या दवाखान्याद्वारे वैद्यकीय उपचार आणि सेवा रुग्णांना मिळतील. शहरातील या दवाखान्यांचा विस्तार ठराविक ग्रामीण भागासाठी होणार आहे.
माय क्लिनिक योजनेत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याबरोबरच पूर्व खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.