आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी ढोल-ताशे आदी वाद्यांच्या गजरात आणि ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ त्या जयघोषात काढण्यात आलेली बेळगाव शहरातील भव्य पारंपारिक श्री गणेश विसर्जन मिरवणुकीची जवळपास 24 तासानंतर आज शनिवारी सायंकाळी 5:25 वाजण्याच्या सुमारास अपूर्व उत्साहाने शांततेत सांगता झाली.
विसर्जन तलावामध्ये आज सायंकाळी राजहंस गल्ली, चव्हाट गल्ली, खडक गल्ली मागोमाग कोनवाळ गल्ली येथील शेवटच्या सार्वजनिक श्रीमूर्तींचे विसर्जन झाल्यानंतर 5:25 वाजता कपिलेश्वर जुन्या विसर्जन तलावात महापालिकेच्या गणपतीच्या स्वरूपात शहरातील अखेरच्या मूर्तीचे विसर्जन होण्याद्वारे श्री विसर्जन मिरवणुकीची यशस्वी सांगता झाली.
श्री अनंत चतुर्दशी निमित्त यंदा कपिलेश्वर तलाव, कपिलतीर्थ तलाव, जक्केरीहोंड, कलमेश्वर तलाव जुने बेळगाव, लाल तलाव अनगोळ, मजगाव ब्रह्मदेव मंदिरा नजीकचा तलाव, किल्ला तलाव आणि कणबर्गी तलाव या ठिकाणी श्री गणेश मूर्ती विसर्जनाची सोय करण्यात आली होती.
सदर 24 तास सलग सुरू असलेली विसर्जन मिरवणूक आज सायंकाळी शांततेत निर्विघ्न पार पडल्याबद्दल महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मिरवणूक समाप्त होताच जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला. यंदाचा गणेशोत्सव कायदा व सुव्यवस्था भंग न होता शांततेत पार पडावा यासाठी गेल्या बऱ्याच दिवसापासून रात्र रात्र जागून महापालिकेच्या सहकार्याने पोलीस प्रशासनाने मेहनत घेतली होती.
त्यामुळे आज अखेर महापालिकेच्या श्री गणेश मूर्ती विसर्जनाने श्री विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडताच महापालिकेच्या वरिष्ठ अधिकारी लक्ष्मी निप्पाणीकर, एसीपी एन. व्ही. बरमनी, टिळकवाडी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक दयानंद शेगुनशी आदी अधिकाऱ्यांना आपला आनंद लपवता आला नाही आणि त्यांनी एकच जल्लोष करत आनंदात्सव साजरा केला.
काल सायंकाळी शहरातील हुतात्मा चौक येथून श्री गणेश विसर्जन मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला होता. हुतात्मा चौकातून रामदेव गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, समादेवी गल्ली, यंदे खुट, धर्मवीर संभाजी चौक, रामलिंग खिंड गल्ली, हिमु कलानी चौक, कपलेश्वर उड्डाण पुलावरून कपिलेश्वर तलाव मिरवणुकीचा मार्ग होता. गेल्या दोन वर्षातील कोरोनाचे निर्बंध हटविण्यात आल्यामुळे यंदाची श्री गणेश विसर्जन मिरवणूक मुक्त आणि जल्लोषी वातावरणात पार पडली.
बेळगावच्या श्री विसर्जन मिरवणुकीला एक वेगळेच महत्त्व असल्यामुळे या मिरवणुकीचा आनंद लुटण्यासाठी शहर परिसरासह परगावातील हजारो गणेश भक्तांनी विसर्जन मार्गाच्या दुतर्फा एकच गर्दी केली होती. काल सायंकाळपासून आज सायंकाळपर्यंत जवळपास सलग 24 तास विसर्जन मिरवणूक सुरू असली तरी न कंटाळता गणेश भक्त मिरवणुकीचा आनंद लुटताना दिसत होते. विसर्जन तलावाच्या ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात उपस्थित अबाल वृद्ध गणेश भक्त, युवती व महिलांनी बाप्पाच्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला होता.
बेळगाव महापालिकेच्या श्री गणेश मूर्तीच्या विसर्जनाने आज सायंकाळी 5:25 वाजता विसर्जन मिरवणूक समाप्त झाली. त्यामुळे कालपासून गजबजलेला गणेश भक्तांच्या सळसळत्या उत्साहाने भारलेला विसर्जन तलावांचा परिसर सायंकाळनंतर भकास जाणवत होता.