स्वातंत्र्य चळवळ, सीमालढा, शेतकरी आंदोलने, क्षत्रिय मराठा समाज अशा विविध क्षेत्रात मोलाचे योगदान देत आपला वेगळाच ठसा उमटविलेले कै. ऍड. किसनराव येळ्ळूरकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी चव्हाट गल्ली येथील जालगार मारुती मंदिरात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या या शोकसभेच्या अध्यक्षस्थानी प्रा. आनंद मेणसे हे होते. सुरुवातील ऍड. सुधीर चव्हाण यांनी शोकप्रस्ताव मांडला. यावेळी उपस्थितांनी उभे राहून मौन पाळत श्रद्धांजली वाहिली.
यावेळी बोलताना प्रा. आनंद मेणसे म्हणाले, ऍड. किसनराव येळ्ळूरकर यांच्याशी आपले बालपणापासूनचे स्नेहसंबंध होते. महाराष्ट्र एकीकरण समितीशी शेवट्पर्यंत प्रामाणिक राहिलेल्या किसनराव येळ्ळूरकर यांची तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीशी अधिक जवळीक होती. ऍड. किसनराव येळ्ळूरकर यांनी मराठा समाजासाठी अमूल्य योगदान दिल्याचे ते म्हणाले.
माजी आमदार मनोहर किणेकर बोलताना म्हणाले, ऍड. किसनराव येळ्ळूरकरांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या अन्यायाविरोधात आवाज उठविला. कुळ कायद्यापासून ते आजपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून शेतकऱ्यांच्या प्रत्येक अडचणीत मोलाची साथ दिली. मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी सुरु असलेल्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेत मराठा समाजातील अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी आर्थिक सहायय केल्याचे सांगितले.
आमदार अनिल बेनके यांनी किसनराव येळ्ळूरकरांना श्रद्धांजली वाहताना आपल्या स्मृतींना उजाळा देत आपल्या आमदार होण्यामागे किसनराव येळ्ळूरकरांची मोलाची साथ असल्याचे सांगितले. क्षत्रिय मराठा समाज परिषदेत २५ वर्षांचा कार्यकाळ शिल्लक असूनही त्यांनी आपल्याला अध्यक्षपद दिले. याचा फायदा आपल्याला विधानसभा निवडणुकीत झाला. या निवडणुकीसाठी किसनराव येळ्ळूरकरांनी आपल्याला मोठा पाठिंबा दिल्याचे त्यांनी सांगितले.
यासह विविध मान्यवरांची श्रद्धांजलीपर भाषणे झाली. या शोकसभेला माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, शिवराज पाटील, नेताजी जाधव, अनंत लाड, गोपाळराव बिर्जे, ऍड. नंदी, प्रा. नीता पाटील, विश्वजित हसबे, विलास पवार आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. प्रा. आनंद मेणसे यांनी अध्यक्षीय भाषणाचा समारोप केला.