टिळकवाडी येथील तिसऱ्या रेल्वे गेटच्या ठिकाणी वाहन चालकांना सातत्याने वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागत असून आज देखील मोठ्या प्रमाणात चक्काजाम झाल्यामुळे येथील रेल्वे ओव्हर ब्रिज (आरओबी) लवकरात लवकर रहदारीसाठी खुला करावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
तिसऱ्या रेल्वे गेटच्या ठिकाणी वरचेवर वाहतूक कोंडी होतच असते. आज शनिवारी देखील हा प्रकार घडला. बराच काळ रेल्वे गेट बंद असल्यामुळे फाटकाच्या दोन्ही बाजूला वाहतुकीची प्रचंड कोंडी होऊन वाहनचालकांना त्रास सहन करावा लागल्याची घटना आज शनिवारी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी घडली. रेल्वे जाणार असल्यामुळे सकाळी तिसरे रेल्वे गेट बराच काळ बंद ठेवण्यात आले होते.
परिणामी गेटच्या दोन्ही बाजूंच्या रस्त्यावर वाहनांची तोबा गर्दी झाली होती. वाहनांच्या गर्दीमुळे खानापूर रोडवर बेळगावच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर बराच काळ चक्काजाम झाला होता. त्या रस्त्यावर गजानन साॅ मीलपासून रेल्वे गेटपर्यंत म्हणजे सुमारे अर्धा कि. मी. लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
सदर वाहतूक कोंडीमुळे तातडीच्या कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना बराच मनस्ताप झाला. शिवाय तातडीच्या रुग्णसेवेत असलेली एक रुग्णवाहिका सायरन वाजवत वाहतूक कोंडीत अडकून पडली होती. वाहतूक कोंडीमुळे प्रतिकूल परिस्थिती निर्माण होण्याचा असा प्रकार तिसऱ्या रेल्वे गेटच्या ठिकाणी सातत्याने घडत असून याकडे तात्काळ गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. आज वाहतूक कोंडीत अडकलेल्या त्या रुग्णवाहिका चालकाचा सायरन वाजवत वाहनांच्या गर्दीतून वाट काढण्याचा केविलवाना प्रयत्न पाहता या मार्गावर एखादी अप्रिय घटना घडण्यापूर्वी जिल्हा प्रशासन आणि रहदारी पोलिसांनी तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी.
तिसऱ्या रेल्वे गेट येथे बऱ्याचदा रहदारी पोलीस हजर असतात, मात्र हे पोलीस वाहतूक सुरळीत करण्याकडे लक्ष देण्याऐवजी ये -जा करणाऱ्या वाळू -विटांच्या गाड्या अडवून पैसे उकळण्यात अथवा दुचाकी वाहन चालकांना वेठीस धरण्यात धन्यता मानत असल्याचा आरोप आहे.
तिसऱ्या रेल्वे गेट येथील वाहतूक कोंडीच्या समस्येवर रामबाण उपाय म्हणजे येथील रेल्वे ओव्हर ब्रिज (आरओबी) वाहतुकीसाठी खुला करणे हा होय. सदर ब्रिजचे किरकोळ विकास काम शिल्लक असल्यामुळे ते त्वरित पूर्ण करून लवकरात लवकर हा ब्रिज वाहतुकीसाठी खुला करावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.