टिळकवाडी तिसऱ्या रेल्वे गेट येथील नव्याने उभारण्यात आलेला रेल्वे ओव्हर ब्रिज नागरिकांच्या सोयीसाठी आहे की त्यांची गैरसोय निर्माण करण्यासाठी? असा संतप्त सवाल सध्या या मार्गावरून नेहमी ये -जा करणाऱ्या वाहन चालक करत आहेत. या ना त्या कारणास्तव हा ब्रिज अद्याप खुला करण्यात आला नसल्यामुळे या ठिकाणी वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच गंभीर बनत चालला असून त्याचा मनस्ताप वाहन चालकांना सहन करावा लागत आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दिवंगत सुरेश अंगडी यांच्या पाठपुराव्यामुळे बेळगावात रेल्वे वर ब्रिज मंजूर होऊन शहरात तीन ठिकाणी हे ब्रिज बांधण्यात आले. कोरोनाचा संसर्ग सुरू होण्याआधी तिसऱ्या रेल्वे गेट येथील रेल्वे ओव्हर ब्रिजचे अर्थात उड्डाणपूलाचे काम सुरू झाले. कोरोना व अन्य तांत्रिक कारणामुळे सदर ब्रिजचे बांधकाम मध्यंतरी रखडले होते. आता अपवाद वगळता या ब्रिजचे काम पूर्ण झाले असले तरी हा ब्रिज वाहतुकीसाठी खुला केलेला नाही. त्यामुळे तिसरे रेल्वे गेट परिसरात वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. अलीकडे पावसाळ्यात या ठिकाणी अनेक अपघातही घडले आहेत. सध्याच्या गणेशोत्सवामुळे सदर रेल्वे गेटवरील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. या रेल्वेवर ब्रिजचे काम सुरूच असताना त्यात भर म्हणजे रेल्वे आली की येथील गेट बंद केले जाते. त्या प्रत्येक वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.
सदर रेल्वे गेटनजीक खानापूरकडे जाणाऱ्या मार्गावर दोन्ही बाजूला पूर्वीपासून असलेला बस थांबा वाहतूक कोंडीला अधिक कारणीभूत ठरत आहे. खरे तर रस्त्यांचा विकास होऊन या ठिकाणी रेल्वे ओव्हर ब्रिज होत असताना येथील वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन सदर बस थांब्याची सोय रेल्वे गेटपासून थोड्या दूरवर करावयास हवी. मात्र अद्यापही तसे घडलेले नाही, त्यामुळे या ठिकाणी थांबणाऱ्या बसेसमुळे वाहतुकीच्या कोंडीत अधिकच भर पडत आहे.
अलीकडेच तिसऱ्या रेल्वे गेटवरील रेल्वे ओव्हर ब्रिज वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी बेळगाव जिल्हा लघुउद्योग संघटनेने खासदार मंगला अंगडी यांच्याकडे गेल्या ऑगस्ट अखेर केली होती. त्यावेळी या संघटनेतर्फे निवेदन सादर केल्यानंतर खासदार अंगडी आणि पावसाळ्यामुळे उड्डाणपुलाचे थोडे काम शिल्लक असून येत्या दोन दिवसात ते पूर्ण होणार आहे. त्यानंतर हा रेल्वे ओव्हर ब्रिज वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. तथापि अद्यापही हा ब्रिज वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही.
परिणामी तिसरे रेल्वे गेट येथील रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम पूर्ण झाल्याचे तर दिसते पण तो खुला का केला जात नाही? असा प्रश्न वाहन चालकांना पडला आहे. एकंदर परिस्थिती पाहता शहरातील रेल्वे ओवरब्रीचे काम पूर्ण झाल्यावर तो लगेच वाहतुकीसाठी खुला करण्यात येतो. त्यानंतर उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जात होते.
जुन्या पी. बी. रोडवरील रेल्वे ओव्हर ब्रिजच्या बाबतीत असाच प्रकार घडला होता. जनतेने स्वतःहून या ब्रिजवर रहदारीला सुरुवात करून ब्रिज वाहतुकीसाठी खुला केला होता. तिसऱ्या रेल्वे गेट येथील वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना आणि नागरिकांना होणारा मनस्ताप लक्षात घेता लवकरच जुन्या पी. बी. रोडवरील ओव्हर ब्रिज ज्या पद्धतीने नागरिकांनी स्वतःच खुला केला त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.