बेळगाव सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत वारंवार मागणी करून देखील प्रशासनाने त्याकडे केलेल्या दुर्लक्षाचा फटका सध्या वाहनधारकांना बसत असून प्रमुख रस्त्यांची श्री अनंत चतुर्दशी पूर्वी तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
श्री गणेशोत्सव काळात गैरसोय निर्माण होऊ नये यासाठी शहरातील खराब रस्त्यांची दुरुस्ती केली जावी अशी सातत्याने मागणी केली जात आहे मात्र प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांना विशेषता वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहरातील एसपीएम रोडची अलीकडच्या काळात खाचखळगे पडून दुर्दशा झाली आहे. यात भर म्हणून बेळगाव शहर आणि शहापूरकडे जाणारा प्रमुख मार्ग असलेल्या या रस्त्यावर सध्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत या ठिकाणी गटार आणि ड्रेनेजचे विकासकाम सुरू आहे.
यामुळे काल रात्री एक टेम्पो या रस्त्यावरील खड्ड्यात अडकून पडल्याची घटना घडली. रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांच्या मदतीने बराच आटापिटा केल्यानंतर टेम्पो चालकाला आपला टेम्पो त्या खड्ड्यातून बाहेर काढण्यात यश आले.
या पद्धतीने शहरातील बरेच रस्ते गणेशोत्सव काळात वाहन चालकांना मनस्ताप देणारे ठरत आहेत. शहरातील रस्त्यांची दुरवस्था पाहता महापालिका व जिल्हा प्रशासन केव्हा जागे होणार? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. श्री अनंत चतुर्दशी म्हणजे श्री गणेश मूर्ती विसर्जनाचा दिवस तोंडावर आला आहे. शहरात त्या दिवशी भव्य लक्षवेधी गणेश विसर्जन मिरवणूक निघणार आहे. मात्र शहरातील रस्त्यांची सध्याची दयनीय स्थिती पाहता मिरवणुकी दरम्यान कांही अप्रिय घटना घडणार तर नाही ना? अशी साशंकता व्यक्त केली जात आहे.
तेंव्हा याकडे बेळगावचा गणेशोत्सव पहिल्यांदाच अनुभवणाऱ्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी व महानगरपालिकेचे प्रशासक नितेश पाटील यांनी वेळीच गांभीर्याने लक्ष देऊन युद्धपातळीवर संबंधित प्रमुख रस्त्यांची व्यवस्थित दुरुस्ती करण्याचे आदेश द्यावेत, अशी जोरदार मागणी केली जात आहे.