बेळगाव शहरातील विनाअनुदानित शाळांकडून व्यापारी दरात 100 टक्के घरपट्टी वसूल करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून याबाबतची नोटीस तसेच घरपट्टी चलन दिले जाणार आहे.
महापालिका आयुक्त डाॅ. रुद्रेश घाळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मनपा महसूल विभागाच्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या महसूल विभागाच्या मते सरकारी शाळांच्या इमारतीची घरपट्टी पालिकेकडून वसूल केली जात नाही. ज्या शाळांना सरकारी अनुदान मिळते अशा शाळांच्या इमारती सरकारी व कार्यालयांच्या इमारतींवर 25 टक्के सेवा कर वसूल केला जातो. तथापि विनाअनुदानित शाळांच्या घरपट्टीबाबत पालिकेची ठोस भूमिका नव्हती. कांही विनाअनुदानित शाळा आणि अनेक वर्षांपासून पालिकेला घरपट्टी दिलेले नाही. आता अशा शाळांकडून पूर्वलक्षी प्रभावाने ही घरपट्टी वसूल केली जाणार आहे.
बेळगाव शहरात विनाअनुदानीत शाळांची संख्या जास्त तर आहेच शिवाय त्यांच्या इमारतीही मोठ्या असल्यामुळे महापालिकेला मोठ्या प्रमाणात घरपट्टी मिळणार आहे. बुधवारच्या बैठकीत आयुक्तांनी 100 कोटी रुपये घरपट्टी वसुली करण्याचे उद्दिष्ट महसूल विभागाला दिले आहे.
दरम्यान गेल्या आठवड्यात महापालिकेने बेळगाव शहरातील एका नामांकित विनाअनुदानित शाळेला तब्बल 44 लाख रुपये घरपट्टी भरण्याची नोटीस दिली आहे.
त्याचवेळी शहरातील अन्य विनाअनुदानित शाळा नाही नोटीस दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती जी आता खरी ठरत आहे.