Monday, December 23, 2024

/

बिबट्या माघारी पुन्हा आपल्या स्वगृही तर गेला नसेल ना?

 belgaum

बेळगाव गोल्फ कोर्स मैदान परिसरात दडी मारलेल्या बिबट्याचा शोध घेऊन त्याला जेरबंद करण्यासाठी जवळपास महिना झाला सर्वतोपरी प्रयत्न करूनही वन खात्याला अद्याप यश आलेले नाही. गेल्या तीन-चार दिवसांपासून तर बिबट्या गायबच असून 27 ट्रॅप कॅमेरे, सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे कोठेच तो आढळलेला नाही. त्यामुळे बिबट्या पुन्हा माघारी आपल्या नैसर्गिक अधिवासात गेल्याचा तर्क व्यक्त केला जात आहे.

बेळगाव परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा महिन्याभरापासून गोल्फ मैदान परिसरात शोध घेतला जात आहे. मात्र त्याला पकडण्यात वनखात्याला यश आलेले नाही. त्यातच गेल्या चार दिवसापासून बिबट्या नजरेस पडलेला नाही किंवा त्याच्या पाऊलखुणाही आढळून आलेल्या नाहीत. तथापि गोल्फ रेसकोर्स मैदान जंगल परिसरात आज रविवारी पुन्हा कोंबिंग ऑपरेशन अर्थात बिबट्याची शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे.
गेले कांही दिवस बिबट्याचा मागमुस नसल्यामुळे आजची ही शोध मोहीम शेवटची ठरण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

रविवारी सकाळी 150 वन खात्याचे आणि 100 पोलिसांसह 250 जणांनी मोठे कोंबिंग ऑपरेशन राबवले 2 हत्ती सह फटाके वाजवून एक तासाहून अधिक वेळ कोंबिंग झाले मात्र बिबट्याचा कोणताच सुगावा लागला नाही.Golf course

बेळगाव गोल्फ कोर्स मैदान परिसरात वावरणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी तज्ञ मंडळी, शेकडो कर्मचारी, मुधोळ हाऊंड कुत्री, प्रशिक्षित हत्तींसह इतर माध्यमातून सर्व प्रयत्न झाले. परंतु त्याचा कांहीही उपयोग होऊ शकला नाही. शोध मोहीम नियोजनबद्धरीत्या न राबविल्यामुळे बिबट्या निसटला होता. बिबट्याच्या दहशतीमुळे परिसरातील 22 शाळांना महिन्याभरापासून सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. आता गेल्या चार दिवसापासून बिबट्याचा कोठेच पत्ता नसल्यामुळे तो पुन्हा नैसर्गिक अधिवासात गेला असावा असा अंदाज वनखात्याकडून व्यक्त होत आहे. मात्र जोपर्यंत वस्तुस्थिती स्पष्ट होत नाही तोपर्यंत सर्व ती खबरदारी घेतली जाणार आहे. सध्या बिबट्या कुठेच आढळत नसल्यामुळे शोधमोहीमही थंडावली असून सकाळी 40 तर सायंकाळी 80 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कोंबिंग ऑपरेशन हाती घेतले जात आहे. त्यानुसार आज रविवारी शोध मोहीम राबविण्यात येत आहे.

रेस कोर्स परिसरात बिबट्याचा वावर असताना मंडोळी परिसरातही शुक्रवारी बिबट्या सदृश्य प्राणी आढळून आल्यामुळे वनविभाग चक्रावून गेला आहे. त्यामुळे सध्या तेथेही पिंजरे लावण्यासह वन अधिकारी व कर्मचारी तळ ठोकून आहेत. बिबट्या हा निशाचर प्राणी असल्यामुळे तो रात्री प्रवास करतो याखेरीस तो जास्त काळ एकाच ठिकाणी राहत नाही. त्यामुळे बेळगावचे गोल्फ कोर्स मैदान सोडून तो पुन्हा आपल्या नैसर्गिक अधिवासात परतला असावा असा कयास आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.