शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा असणारी दहावीची परीक्षा कोरोनाच्या सावटानंतर यावर्षी सुरळीतपणे पार पडणार आहे. 2022– 2023 या सालात घेण्यात येणाऱ्या दहावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची 75 टक्के हजेरी मात्र सक्तीची करण्यात आली आहे.
गत दोन वर्षाच्या कालावधीत घरातूनच अभ्यास करून विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले होते मात्र यंदा शाळेतील उपस्थिती सक्तीची असून 75 टक्के उपस्थिती असणाऱ्यांनाच दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज करण्यात येणार आहे.
कर्नाटक माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे दरवर्षी दहावीची परीक्षा घेण्यात येते.परीक्षेच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सूचना मंडळातर्फे देण्यात येतात.त्यानुसार सर्वात महत्त्वाची अट म्हणजे विद्यार्थ्यांची उपस्थिती.
दरवर्षी उपस्थितीचा मुद्दा प्राधान्याने प्रथम क्रमांकावर असतो मात्र दोन वर्ष कोरोनाच्या काळात याकडे दुर्लक्ष करून याबाबत सक्ती करण्यात आली नव्हती. मात्र यावर्षीपासून पुन्हा 75 टक्के विद्यार्थ्यांची शालेय उपस्थिती पाहूनच त्यांना परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात येणार आहे.
दहावीची परीक्षा प्रामुख्याने मार्च च्या दरम्यान घेण्यात येतात. तत्पूर्वी परीक्षेसाठी अर्ज भरून घेतले जातात सदर दहावीच्या परीक्षेचे अर्ज भरत असताना प्रामुख्याने 75 टक्के उपस्थितीचा मुद्दा देखील नमूद करण्यात आला असून 75 टक्के उपस्थिती असल्याखेरीज विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बसता येणार नसल्याचे मंडळाने नमूद केले आहे. यामुळे शाळेला उपस्थित न राहता परीक्षेला बसू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना तसे करता येणार नाही.