बेळगाव लाईव्ह विशेष : “स्मार्ट सिटीचे काम आणि सहा महिने थांब” अशी नेहमीची बोंब असणाऱ्या स्मार्ट सिटी कामकाजातील त्रुटींमुळे बेळगावमध्ये पालिका आयुक्तांसह स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांवर जनता कडक ताशेरे नेहमीच ओढत आली आहे. अगदी स्मार्ट सिटी योजना बेळगावात सुरु झाल्यापासून प्रत्येक कामात त्रुटी आढळून आल्या असून कोट्यवधी रुपये खर्चून, जनतेच्या पैशाची नासाडी करून स्मार्ट सिटीच्या नावाखाली जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यात येत असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. इतकेच नाही तर स्मार्ट सिटी कामकाजात निधीचा गैरवापर करून भ्रष्टाचार झाल्याचेही आरोप करण्यात येत आहेत.
हे आरोप अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी कितीही फेटाळले तरी स्मार्ट सिटी कामातील त्रुटी, अवैज्ञानिक आणि अशास्त्रीय पद्धतीने करण्यात येत असलेल्या कामकाजावरून सर्व आरोप खरे असल्याचे सिद्ध होत आहे. याचाच प्रत्यय सध्या जिजामाता चौकात येत आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत याठिकाणी उभारण्यात आलेला रेल्वे उड्डाणपूल, रेल्वे उड्डाणपुलासाठी या भागात करण्यात आलेले रुंदीकरण, गटारीचे बांधकाम, सर्व्हिस रोड यासह येथील सर्वच कामकाज फोल ठरले आहे.
वळिवाच्या पावसासह भर पावसात देखील येथील रस्त्यावर तलावाचे स्वरूप निर्माण होत आहे. या रेल्वे उड्डाणपुलाखाली दुपदरी रेल्वे रुळाचे कामकाज करण्यात येत असून उड्डाणपुलाखाली निर्माण करण्यात आलेल्या सर्व्हिस रोडचे काम अद्याप अर्धवट स्थितीत आहे. याठिकाणी असलेल्या गटारीचे नियोजन देखील चुकीचे झाले असून या परिसरात सुरुवातीला असलेला १४ फुटांच्या गटारी पुढे जाऊन पाच फूट झाल्याने पावसाच्या पाण्याचा त्याचप्रमाणे दूषित पाण्याचा योग्यप्रकारे निचरा होत नाही. परिणामी या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. बेळगाव शहरातील अर्ध्याहून अधिक दूषित पाणी किंवा पावसाचे पाणी, गटारींमार्फत जाणारे पाणी या परिसरातील नाल्याला येऊन मिळते. परंतु पाण्याचा योग्यप्रकारे निचरा होत नसल्याने या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे.
यासंदर्भात गेल्या अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधी, अधिकारी, महानगरपालिका, रेल्वे प्रशासन, स्मार्ट सिटी अधिकारी, कंत्राटदार यांच्याकडे अनेकवेळा तक्रारी देण्यात आल्या आहेत. मात्र प्रत्येकाच्या दारी गेल्यानंतर प्रत्येकजण हात वर करून जबाबदारी झटकत आहे. विद्यमान आमदारांच्या कानावर देखील सातत्याने येथील नागरिकांनी हि समस्या घातली आहे. परंतु आमदारांनीही याप्रकरणी दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
सदर उद्भवलेल्या समस्येची जबाबदारी आपल्याकडे नसल्याचे स्पष्टपणे सांगण्यात येत आहे. या प्रकारामुळे जनता पुरती वैतागली असून नेमकी या समस्येची जबाबदारी कुणाकडे आहे? आणि आपले गाऱ्हाणे कुणासमोर मांडावे? अशा द्विधा मनस्थिती सध्या येथील जनता अडकली आहे.
बेळगाव शहराच्या विकासाच्या नावाखाली करण्यात येणारे हे विद्रुपीकरण प्रशासनाने, सरकारने आणि स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांनी वेळीच थांबवावे, जनतेची दिशाभूल करून विकासाच्या नावावर करण्यात येत असलेली फसवणूक, पैशांची उधळपट्टी थांबवावी, अन्यथा जनतेचा प्रक्षोभ उडाल्यास स्मार्ट सिटी प्रकरण सर्वांनाच महागात पडेल यात तिळमात्र शंका नाही.