बेळगाव लाईव्ह विशेष: हिंदू धर्मातील महत्वाच्या सणांपैकी एक असलेल्या श्री गणेशोत्सवात विविध प्रांतात विविध परंपरा साजऱ्या केल्या जातात. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला श्री गणेशाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेनंतर दीड दिवस, पाच दिवस किंवा अकरा दिवस साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात विविध प्रथा परंपरा साजऱ्या केल्या जातात. याचाच एक भाग म्हणून श्री गणेश चतुर्थीच्या दुसरे दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध पंचमीला विविध प्रथा आचरणात आणल्या जातात.
बेळगावमध्ये यादिवशी उंदीर बीज किंवा उंदरी या नावाने हि प्रथा साजरी केली जाते. विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबात ही प्रथा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. संपूर्ण श्रावण मासात मांसाहार वर्ज्य करण्यात आल्याने “उंदरी” या दिवशी विशेष मांसाहार करण्याची परंपरा पाळली जाते.
उंदीर बीज किंवा उंदरी याप्रमाणेच अनेक भागात ऋषी पंचमीही साजरी केली जाते. सप्तर्षींची पूजा आणि व्रताहार यात बैलाच्या कष्टाने न पिकणाऱ्या पिकाचे आणि विशेषतः कंदमुळांचा समावेश असलेले पदार्थ बनवून गणपती समोर नैवेद्य दाखविला जातो. भुईमूग, गाजर, सुरण, अळू, मका, श्रावण शेंगा, भोपळा, दुधी भोपळा यासह अनेक भाज्यांचा समावेश असलेलं सैंधव मीठ, ओली मिरची, ओलं खोबर यापासून बनविलेलं फतफतं आणि यासोबत वरईचा तांदूळ असे या नैवेद्याचे स्वरूप असते. विशेषतः महाराष्ट्र आणि कोकण भागात प्रामुख्याने हे व्रत केले जाते.
बेळगावमध्ये विविध ठिकाणी विविध प्रकारे हि प्रथा साजरी केली जाते. घरात मांसाहार करून श्री गणेशाचे वाहन असलेल्या उंदराला याचा नैवेद्य दाखविला जातो. त्याचप्रमाणे शेतातदेखील याचा नैवेद्य दाखविला जातो.
आपल्या जीवाचे रान करून पिकविलेल्या पिकाचे नुकसान होऊ नये यासाठी मांसाहाराचा नैवेद्य शेतातील पिकाला दाखविण्यात येतो, अशी परंपरा आहे. गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ग्रामीण भागात ‘करिदिन’ म्हणून पाळला जातो. यादिवशी शेतातील कोणतीही कामे केली जात नाहीत.
श्रावण महिन्यात मांसाहाराच्या दुकानातील गर्दी कमी झाली होती. मात्र आजपासून पुन्हा मांसाहार सुरु झाल्याने गुरुवारी सकाळपासूनच बेळगावमधील मटण दुकानात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली.