बेळगावच्या राणी चन्नम्मा विद्यापीठाचा दहावा दीक्षांत समारंभ येत्या १४ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. १४ सप्टेंबर रोजी होणारा दीक्षांत समारंभ विधानसौध येथे आयोजित करण्यात आला असून यावेळी तब्बल ४३६०७ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू रामचंद्रगौड यांनी माहिती विभागात आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल थावरचंद गेहलोत हे उपस्थित राहणार असून उच्च शिक्षणमंत्री डॉ. अश्वथनारायण, आंध्रप्रदेश येथील आदिवासी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. टी. व्ही. कट्टीमनी आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती असेल.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मानद डॉक्टरेट बहाल केली जाणार आहे. यामध्ये समाजसेवक रविचंद्र, कन्नड सिनेसृष्टीचे रमेश अरविंद, दासोहच्या अन्नपूर्णाताई यांचा समावेश आहे.
राणी चन्नम्मा विद्यापीठांतर्गत बेळगावसह विजापूर, बागलकोट या जिल्ह्यातील ४१८ महाविद्यालये जोडली गेली असून सध्या १.६४ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
यातील ४३६०७ विद्यार्थ्यांसाठी पदवीप्रदान केली जाणार आहे. यापैकी ११ विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी असून पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली.