गेल्या कांही दिवसापासून सातत्याने पडणाऱ्या मुसळधार पावसाचा कहर झाल्यामुळे सीमावर्ती बेळगाव जिल्ह्यामध्ये पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला असून जिल्ह्यातील विविध ठिकाणचे 17 पूल पाण्याखाली गेले आहेत.
गेल्या एक-दोन आठवड्यापासून महाराष्ट्रासह सीमावर्ती भागात असलेल्या चिक्कोडी, कागवाड, रायबाग, अथणी, निप्पाणी आदी भागात संततधार पाऊस कोसळत आहे. सततच्या पावसामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या चार दिवसात अतिवृष्टीमुळे जवळपास 35 घरे कोसळली असून दोघांचा बळी गेला आहे. बैलहोंगल, सौंदत्ती, चिक्कोडी आणि बेळगाव तालुक्यामध्ये एकुण 16 घरे तर निप्पाणी तालुक्यात पावसामुळे 19 घरे क्षतीग्रस्त झाली आहेत. अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. पश्चिम घाटामध्ये गेल्या चार दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे घटप्रभा, हिरण्यकेशी, मार्कंडेय या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्याचप्रमाणे ओढ्यानाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे हिडकल जलाशयामधून 20 हजार पेक्षा अधिक क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशय परिसरात पुन्हा पावसाचा जोर वाढल्यामुळे काल रविवारी जलाशयाचे दोन दरवाजे 4 इंचांनी खुले करण्यात आले आहेत. संभाव्य धोका लक्षात घेऊन घटप्रभा व हिरण्यकेशी नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. हिरण्यकेशी दुथडी वरून वाहत असल्याने संकेश्वर बंधारा पाण्याखाली गेला आहे. गोकाक -शिंगळापूर, हुक्केरी -यरनाळ, कुरणे -कोचरी, कोन्नूर -बोरवाड, अक्कोळ -सिदनाळ हे पूल पूरग्रस्त झाले आहेत. कोन्नूर -भोजवाड, कोन्नूर -बोरवाड, भिवशी -जत्राट हे पूल संपूर्णता पाण्याखाली गेले आहेत.
गोकाक तालुक्यातील लोळसुर पूल आणि हुक्केरी तालुक्यातील हुक्केरी -यरनाळ पूल नदीच्या पाण्याखाली गेला आहे. प्रशासनाकडून नदी काठावर असलेल्या नागरिकांना जनावरांसह सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे आवाहन केले जात आहे. रविवारी दिवसभर मुसळधार पावसाने अक्षरशः कहर केला. परिणामी या पावसामुळे निपाणी तालुक्यातील दूधगंगा वेदगंगा नदीवरील कारदगा, बारवाड, जत्राट, सिदनाळ व खडकोळ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
गेल्या शनिवारी रात्रभर आणि काल रविवारी दिवसभर पावसाने झोडपून काढल्यामुळे बेळगाव शहर व ग्रामीण परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. त्याचप्रमाणे कंग्राळी खुर्द येथील मार्कंडेय नदीवरील जुना पूल तिसऱ्यांदा पाण्याखाली गेला. खानापूर तालुक्यातील जांबोटी, कणकुंबी, बैलूर भागात पावसाचा जोर वाढला आहे. तालुक्यातील मलप्रभा नदी दुधडी भरून वाहत असून याच नदीच्या पात्रात असलेले हब्बनहट्टी येथील स्वयंभू मारुती मंदिर पाचव्यांदा पाण्याखाली गेले आहे.