Friday, December 27, 2024

/

संततधार कायम.. जनजीवन विस्कळीत; गारठले शहर

 belgaum

बेळगाव शहर परिसरासह ग्रामीण भागात गेल्या चार-पाच दिवसापासून परतीच्या पावसाने आपला दणका देणे सुरू ठेवले आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी होण्याबरोबर जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज सोमवारी तर सततच्या ढगाळ पावसाळी वातावरणामुळे जनजीवन गारठून गेले आहे.

गेल्या शनिवारी रात्रभर शहराला झोडपून काढणाऱ्या पावसाने काल रविवारी दिवसभर हजेरी लावली होती. आज सोमवारी देखील दिवसभर पावसाळी वातावरण असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे बाजारपेठेतही म्हणावी तशी गर्दी दिसत नव्हती. गेल्या दोन दिवसातील संततधार पावसामुळे शहरातील ठिकठिकाणच्या सखल भागात पाणी साचले आहे.

त्याचप्रमाणे कपिलेश्वर रेल्वे ओव्हर ब्रिज, फोर्ट रोड, बी. एस. यडीयुरप्पा रोड वगैरे काही रस्त्यांवर पाणी आल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे सततचा पाऊस व ढगाळ वातावरणामुळे आज दिवसभर हवेतील गारठ्यात कमालीची वाढ झाल्याचे जाणवत होते. परिणामी नागरिकांना ठेवणीतल्या उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे.

गणेशोत्सवाच्या पंधरा दिवस आधी चांगली उघडी घेणाऱ्या पावसाने ऐन उत्सवात कधी दुपारी तर कधी संध्याकाळी जोरदार हजेरी लावली. अनंत चतुर्दशी दिवशी देखील दिवसभर पावसाची रिपरीप सुरूच होती. त्यानंतर शनिवार रात्रीपासून पाऊस सतत बरसत असल्यामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. अनेक ठिकाणी गटारी तुंबून रस्त्यावर पाण्याची तळी साचली आहेत.Rain

त्याचप्रमाणे शहरात बऱ्याच ठिकाणी गटारीतील गाळ, केरकचरा, घाण रस्त्यावर पसरून अस्वच्छता निर्माण झाली आहे. विकास कामे सुरू असलेल्या ठिकाणी तर चिखल मातीची दलदल निर्माण झाली आहे. गॅस वाहिन्या वगैरे घालण्यासाठी खोदकाम करण्यात आलेल्या रस्त्यांची पावसामुळे दुर्दशा झाली आहे.

या सर्व प्रकारांमुळे वाहनचालकांना विशेष करून दुचाकी स्वारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पावसाचे अधून मधून विश्रांती घेत मुसळधार हजेरी लावणे सुरूच असल्यामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत असून जलाशयाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.