देशभरात पीएफआय(पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) संघटनेच्या नेत्यांची घरे आणि कार्यालयांवर धाडसत्र सुरू असून आता त्याचाच भाग म्हणून बेळगाव जिल्ह्यातील पीएफआय संघटनेवर लगाम कसण्याची कारवाई सुरू झाली आहे.
बेळगावातील पीएफआय संघटनेचे नेते व प्रमुख कार्यकर्त्यांच्या घरावर आज मंगळवारी पहाटे 3 वाजल्यापासून पोलिसांनी धाडी टाकून एकूण 7 जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सातही जणांची चौकशी करून त्यांची हिंडलगा मध्यवर्तीय कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे काकती नजीकच्या राष्ट्रीय महामार्गावर नाकेबंदी करून पीएफआय कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. एकंदर राष्ट्रीयस्तरावर पीएफआय नेते व कार्यकर्त्यांच्या घरावर छापेमारीचे जे सत्र सुरू झाले आहे, त्या धरपकडीच्या सत्राची आता बेळगावात देखील अंमलबजावणी सुरू झाली आहे.
आज सकाळी बेळगाव पोलिसांनी छापेमारी करून अटक केलेल्या पीएफआय संघटनेच्या 7 जणांची नावे पुढील प्रमाणे आहेत. 1) अबीदखान गौसखान कडोली (रा. असदखान कॉलनी बेळगाव), 2) बद्रुद्दीन हसन साहब पटेल (रा. असदखान कॉलनी बेळगाव), 3) सलाउद्दीन बाबूसाब केल्पेवाले (रा. वीरभद्रनगर बेळगाव),
4) समीउल्ला अब्दुल मजीद पिरजादे (रा. तांबेडकर गल्ली शहापूर), 5) जाकीरूल्ला फारूक फैजे (रा. आझम नगर बेळगाव), 6) रिहान अब्दुल शायन्नावर (रा. डायमंड रेसिडेन्सी बेळगाव), 7) जहीर गौस मुद्दिन घीवाले (रा. आझम नगर बेळगाव).