गाई, म्हशींपाठोपाठ पाठोपाठ कोंबड्यांनाही आता लंपी स्किन रोगाची लागण झाल्याची अफवा पसरल्याने पोल्ट्री व्यावसायिक अस्वस्थ झाले असले तरी कोंबड्यांना झालेला रोग लंपी स्कीन नसून ‘फाऊल पाॅक्स’ नावाचा सामान्य रोग असल्याचे पशु संगोपन खात्याने स्पष्ट केले आहे. तसेच लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.
लंपी स्किन रोगाने सध्या जिल्ह्यात थैमान घातले आहे. विषाणूजन्य रोग असल्याने त्याचा संसर्ग झपाट्याने होत आहे. योग्य औषधोपचारा अभावी जनावरे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे पशुधन धोक्यात आले असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण कायम असतानाच गाई, म्हशींपाठोपाठ कोंबड्यांनाही आता लंपी स्कीन रोगाची लागण होत असल्याचे फोटो आणि माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये कोंबड्यांचा आरी, शरीर, पायावर तसेच मांसालाही गाठी आल्याचे दर्शविण्यात आले आहे. परिणामी पोल्ट्री व्यावसायिक आणि खवय्यांमध्ये संभ्रव आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोनामुळे दोन वर्षे पोल्ट्री व्यवसायावर मोठा परिणाम झाला होता. आता रोगामुळे हा व्यवसाय धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली असली तरी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोची सत्यता पडताळून पाहिली जात आहे. तोपर्यंत कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पशु संगोपन खात्याने केले आहे.
दरम्यान कोंबड्यांना लंपी स्किन झाल्याचे व्हायरल फोटो आमच्यापर्यंत आले आहेत तथापि कोंबड्यांना लंपी स्कीन झाल्याचे ऐकिवात नाही. कोंबड्यांना फाऊल पॉक्स नावाचा सामान्य रोग होतो. त्यात अंगावर फोड येऊन कमकुवत कोंबड्यांचा मृत्यू होतो, असे पशु संगोपन खात्याचे प्रभारी उपसंचालक डॉ. यरगट्टी यांनी स्पष्ट केले आहे.