बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे खेळाडू, आजी आणि माजी सैनिकांच्या नातलगांसाठी आयोजित अग्नीवीर भरती मेळाव्याच्या आजच्या पाचव्या दिवशी बेळगावसह कर्नाटक व आंध्र प्रदेश येथील उमेदवारांची निवड प्रक्रिया घेण्यात आली. या भरतीत 706 युवकांचा सहभाग असून ती उद्याही सुरू राहणार आहे.
सैन्याच्या मुख्यालय आरक्षण कोट्या अंतर्गत सैन्यातून निवृत्त आणि सैन्यात कार्यरत जवानांचे भाऊ, मुले यांच्यासाठी तसेच राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंसाठी गेल्या सोमवारपासून बेळगावात पहिल्यांदा अग्निवीर भरती प्रक्रिया सुरू आहे. आजच्या पाचव्या दिवशी अग्नीवीर सोल्जर जनरल ड्युटी पदाकरिता कर्नाटक व आंध्र प्रदेशातील उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली.
बेळगाव जिल्हासह सदर दोन्ही राज्यातील 936 युवकांनी आज भरतीच्या ठिकाणी हजेरी लावली होती. यापैकी 230 युवकांना कागदपत्रे व्यवस्थित नसल्यामुळे भरतीतून डावलण्यात आले. त्यानंतर उर्वरित 706 युवकांची शारीरिक मोजमापं घेऊन धावणे वगैरे शारीरिक क्षमता चांचणी घेण्यात आली. या निवड प्रक्रियेसाठी आजचा दिवस अपुरा पडल्यामुळे ती उद्या देखील सुरू राहणार आहे.
अग्निवीर भरतीसाठी अर्ज केलेल्यांना ॲडमिट कार्ड तपासूनच भरतीच्या ठिकाणी प्रवेश दिला जात आहे. या खेरीज भरती प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी पहाटे 5:30 ते 5:45 वाजण्यापूर्वी हजेरी लावणाऱ्या उमेदवारांची नांव नोंदणी करून घेतली जात असून उशिरा येणाऱ्यांना माघारी धाडले जात आहे. त्यानंतर सकाळी 6:30 वाजता भरती प्रक्रिया सुरू केली जात आहे. आता उद्या शनिवार दि. 24 सप्टेंबर रोजी आजची शिल्लक भरती पुढे चालू राहणार असून त्याचबरोबर अग्नीवीर ट्रेडसमनसाठी देशभरातील माजी सैनिकांसाठी भरती प्रक्रिया देखील राबविली जाणार आहे.
दरम्यान, काल गुरुवारी मध्य प्रदेश, छत्तीसगड गोवा व गुजरात या राज्यांसाठी सोल्जर जनरल ड्युटी पदाकरिता भरती प्रक्रिया पार पडली. मात्र या प्रक्रियेला अत्यल्प निराशाजनक प्रतिसाद मिळाला. केवळ 35 युवक भरतीसाठी उपस्थित होते. याला कारण म्हणजे पहिल्या दिवशी खेळाडूंच्या भरतीवेळी गोव्यातील युवकांना डावलण्यात आला होतं. त्यामुळे कालच्या भरतीप्रसंगी गोव्याच्या युवकांनी हजेरीच लावली नाही, तसेच दूरवर असल्यामुळे मध्य प्रदेश, छत्तीसगड व गुजरात येथील मोजकेत युवक उपस्थित होते.
बेळगावातील अग्नीवीर भरती मेळाव्याचा सोमवार दि. 26 सप्टेंबर हा शेवटचा दिवस आहे. या दिवशी अग्नीवीर क्लार्क, स्टोअर कीपर व टेक्निकल पदासाठी उमेदवारांची भरती होणार आहे.