राज्य सरकारच्या येत्या डिसेंबरमध्ये बेळगाव होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाप्रसंगी मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या दोन मजल्यांचे उद्घाटन केले जाईल, अशी माहिती शहराचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी दिली.
बीम्स हॉस्पिटल येथे बीम्स संचालक डॉ. अशोककुमार शेट्टी यांच्या सोबत बैठक घेतल्यानंतर आज शनिवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आमदार ॲड. बेनके म्हणाले की, डिसेंबरमध्ये बेळगाव येथे हिवाळी अधिवेशन होणार असून, त्यावेळी बेळगाव शहरातील प्रगतीपथावर असलेल्या मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन केले जाणार आहे.
बेळ्ळारी हॉस्पिटलमध्ये जी समस्या झाली ती बेळगावच्या बीम्स हॉस्पिटलमध्ये होऊ नये. ऑक्सिजनची समस्या होणार नाही याची काळजी घ्यावी, तसेच वीज बिघाड झाल्यास ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी जनरेटर सज्ज ठेवण्याच्या सूचना आपण दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. हॉस्पिटलच्या जुन्या इमारतींची दुरुस्ती सुरू आहे.
लवकरच बाह्यरुग्णांसाठी जेवणाची खोली बांधण्याबरोबरच हॉस्पिटलमध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाईल. रुग्णांसाठी प्रतीक्षालय बांधण्याचा विचारही सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
बीम्सचे संचालक डॉ. अशोककुमार शेट्टी यांच्या भेटी प्रसंगी आमदारांनी दररोज दाखल होणाऱ्या रुग्णांची आणि दररोज ओपीडीमध्ये जमा होणाऱ्या पैशांची माहिती घेतली. नित्यनियमित बायोमेट्रिक प्रणाली योग्य प्रकारे काम करायला हवी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याबरोबरच रक्त देणे, एक्स-रे आदी अत्यावश्यक सेवा जनतेसाठी 24 तास उपलब्ध ठेवाव्यात अशी सूचना आमदार ॲड. अनिल बेनके यांनी यावेळी केली.
बिम्सला दिलेल्या भेटी प्रसंगी आमदारांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाची, ऑक्सिजन पुरवठ्यासाठी वापरल्या जाणार्या जनरेटरची आणि नव्याने बांधण्यात आलेले मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कामाची पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत बिम्सच्या सीईओ शाहिदा आफरीन, सीएओ आणि एफ. गौरीशंकर यांच्यासह वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.