मंडोळी (ता. बेळगाव) परिसरात गेल्या बुधवारी शेतकऱ्याला त्यानंतर पुन्हा गुरुवारी एका महिलेला बिबट्या सदृश्य प्राणी दिसल्यामुळे तीन दिवस शोध घेऊनही मंडोळीत ठाण मांडून असलेल्या वनाधिकाऱ्यांच्या हाती कोणताही सुगावा लागलेला नाही.
मंडोळी येथील मोरारजी देसाई वसती शाळेनजीकच्या परिसरात बिबट्या सदृश्य प्राणी आढळल्याने त्या ठिकाणी दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
मात्र गेल्या तीन दिवसात कॅमेऱ्यांमध्ये कोणत्याही प्राण्याची छबी कैद झालेली नाही तसेच परिसराची पाहणी केल्यानंतर बिबट्या अथवा त्याच्यासारख्या अन्य प्राण्यांच्या पायाची ठसे ही सापडलेले नाहीत. बिबट्याचा शोध घेण्यासाठी काल शुक्रवारी दिवसभर मंडळी परिसरात वनखात्याचे अधिकारी ठाण मांडून होते.
बिबट्या मंडोळी गावानजीकच्या भागात वावरत असल्याचा कयास असल्यामुळे कॅमेरे बसविण्याबरोबरच कांही ठिकाणी सापळेही बसविण्यात आले आहेत.
बिबट्याचा शोध जारीच आहे मात्र त्याचे पायाचे ठसे वगैरे काहींच आढळलेले नसल्यामुळे मंडोळीवासियांनी कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये. फक्त शेतीवाडीसह गवताळ झाडे झुडपे असणाऱ्या परिसरात वावरताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.