मेन रोड मुतगा (ता. जि. बेळगाव) येथील शेतकरी रमेश शंकर पाटील यांचा उमदा बैल शुक्रवारी पहाटे लंपी स्किनमुळे मृत्युमुखी पडला. सदर बैल सुमारे 60 हजार रुपये किमतीचा होता.
मेन रोड मुतगा येथील शेतकरी रमेश शंकर पाटील यांचा शेतीचा बैल लंपी स्किन रोगाची लागण झाल्याने गेल्या कांही दिवसांपासून आजारी होता. अखेर उपचाराचा फायदा न होता आज शुक्रवारी पहाटे तो दगावला. यामुळे पाटील यांचे सुमारे 60 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
लंपी स्कीन रोगामुळे एकट्या मुतगा गावामध्ये गेल्या महिनाभराच्या कालावधीत तब्बल सुमारे 35 बैलांचा बळी गेला आहे. या बैलांमध्ये शर्यतीच्या तीन बैलांचा समावेश आहे. हे बैल मुतगा गावातील शर्यतप्रेमी शेतकरी शिवाजी कणबरकर, संजय चौगुले व यल्लाप्पा भरमा चौगुले यांच्या मालकीचे होते.
कणबरकर यांच्या गेल्या 21 सप्टेंबर रोजी मृत्युमुखी पडलेल्या नगऱ्या नावाच्या बैलाने तर सीमाभागातील 50 हून अधिक शर्यती जिंकल्या होत्या. त्यामुळे तो शर्यतशौकिनांच्या गळ्यातील ताईत बनला होता. संजय व यल्लाप्पा चौगुले यांच्या बैलांनी देखील शर्यतीत चांगले नांव कमावले होते.
एकंदर बेळगाव तालुक्याच्या पूर्व भागात मुतगा गावामध्ये लंपी स्किनमुळे सर्वाधिक बैल दगावले आहेत. त्यामुळे शासनाने उपचाराची गती वाढवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर योग्य ती नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पशुपालक शेतकरीवर्गातून होत आहे.
मागील पंधरा दिवसांत बेळगाव तालुक्यात मृत्युमुखी पडलेल्या शर्यतीच्या बैलांची संख्या तीन वर पोहोचली आहे.वडगांव येथील नाग्या हा शर्यतीचा राजा वृद्धपकाळाने मयत झाला होता त्यानंतर मुतगा येथे शर्यतीचे दोन बैल मयत झाले आहेत.