पशुधन हीच तर खरी शेतकऱ्यांची संपत्ती असते आणि त्यातही शर्यतीचा नाद काहीतरी वेगळाच. आपल्या पोटच्या पोराप्रमाणे त्या पशुधनाला जपत शेतकरी त्यांची काळजी घेतो.आणि जेव्हा हेच पशुधन आपल्यातून नाहीसे होते तेव्हा मात्र शेतकरी पुरता हारतोच.अगदी एखाद्या चित्रपटाला शोभेल अशीच ही घटना.
शर्यतीचा बादशाह असणारा आणि शर्यती जिंकून देणारा हुकमी एक्का म्हणजेच नाग्या.बैल.. परशराम मलाप्पा पाखरे यांचा शर्यती जिंकून देणारा हिंद केसरी नाग्या बैल आज हरपला….
कारभार गल्ली वडगाव येथील परशराम मल्लाप्पा पाखरे यांच्या नाग्या नावाच्या शर्यतीच्या बैलाचे रविवारी सकाळी सव्वासात वाजता निधन झाले. आणि मालकाबरोबरच परिसरातील शेतकरी आणि शर्यती प्रेमींना दुःखात ढकलून नाग्या निघून गेला. मागील 21 वर्षापासून महाराष्ट्र कर्नाटक सह तब्बल 500 हून अधिक शर्यतीमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्राप्त केलेला हिंदकेसरी नाग्या हरपल्यामुळे-शर्यतीचा बादशहा नाग्या हरपला असल्याच्या प्रतिक्रीया व्यक्त करण्यात आल्या परिणामी त्याचे अचानक जाण्याने सर्वांमधून हळहळ व्यक्त होत आहे.
21 वर्षांपूर्वी अंकलगी येथून एक लाख 62 हजार रुपयांना केवळ दोन वर्षाचा असणारा नाग्या, मल्लाप्पा पाखरे या कुटुंबीयांनी शर्यतीसाठी आणला होता तेव्हापासून त्याचा सांभाळ करण्याबरोबरच अगदी मुलाप्रमाणे त्याला बदाम खारका, दूध, अंडी डोक्याचे सूप असे खाणे घालून त्याला जपले होते
नाग्याने देखील आपले मालकाप्रतीचे प्रेम विविध म्हणजेच 500 हून अधिक प्रथम क्रमांकाच्या शर्यती जिंकून व्यक्त केले होते. यामुळे नाग्या प्रत्येकाचा लाडका बनला होता कोरोनाच्या काळापूर्वी शेवटची शर्यत जिंकली होती. त्यानंतर मागील तीन वर्षापासून नाग्याला शर्यतीला जुंपला नव्हता आणि आज अचानक त्याचे निधन झाल्याने नाग्या हरपला हे वास्तव मान्य करणे अशक्य बनले.दुपारी दोन वाजता वडगाव स्मशानभूमीत नाग्याची भव्य मिरवणूक काढून दफन विधी करण्यात येणार आहे.