श्री गणेशोत्सवातील भाद्रपद महिन्यातील शुद्ध पक्षात ज्येष्ठ गौरींचे आगमन होते. सौभाग्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या सणासाठी गणपतीसोबतच गौराईच्या आगमनाचीही तयारी मोठ्या उत्साहात केली जाते.
शनिवारी या ज्येष्ठ गौरींचे आगमन मोठ्या थाटामाटात करण्यात आले. पाणवठ्यावर गौराई भरून घरोघरी गौराईचे आगमन विविध स्वरूपात करण्यात आले.
प्रत्येक घराच्या परंपरेनुसार विविध स्वरूपात आज शहर परिसरात गौरी आवाहनाचा सोहळा महिलावर्गाने मोठ्या उत्साहात पार पाडला. अनेक ठिकाणी चिमुरड्या मुलींनी नटून थाटून गौरी आवाहनाचा सोहळा पार पाडला.
काही ठिकाणी कलश सजावट करून तर काही ठिकाणी मुखवटा असलेल्या आणि काही ठिकाणी उभ्या गौरी प्रतिष्ठापना केल्या जातात. खडे, दुर्वा, गौरीची रोपे, अशा अनेक साहित्याच्या माध्यमातून हि पूजा केली जाते. विशेषतः महिला अखंड सौभाग्याचा प्राप्तीसाठी हे व्रत करतात.
गौरी किंवा महालक्ष्मी नावाने संबोधल्या जाणाऱ्या ज्येष्ठा गौरीचे पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते यामुळे त्यांना ज्येष्ठा गौरी असेही म्हटले जाते. बेळगावमध्येही आज प्रत्येकाच्या घरोघरी गौरी आवाहनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आहे.