उत्तर कर्नाटकातील प्रमुख देवस्थानांसह राज्यातील भक्त मोठ्या संख्येने जाणाऱ्या कोल्हापूर येथील सिद्धगिरी मठाला मुजराई खात्याने विशेष अनुदान मंजूर करण्याचा आदेश बजावला आहे, अशी माहिती राज्याच्या मुजराई, हज आणि वक्फ खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले यांनी दिली आहे.
मंत्री शशिकला जोल्ले यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती जाहीर केली आहे. बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे गेल्या 2021 मध्ये झालेल्या अधिवेशनाप्रसंगी धार्मिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार उत्तर कर्नाटकातील प्रमुख देवस्थानांना विशेष अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
या प्रमुख देवस्थानांमध्ये बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती श्री यल्लमा देवस्थान, कलबुर्गी जिल्ह्यातील गाणगापूर येथील श्री दत्तात्रय स्वामी देवालय, उत्तर कर्नाटकातील भक्तगण बहुसंख्येने जेथे जातात तो कोल्हापुरातील सिद्धगिरी मठ आणि मैलार लिंगेश्वर स्वामी देवस्थान यांना प्रत्येकी 3 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
सदर अनुदानाचा देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी व्यवस्थित विनियोग केला जावा अशी सूचना संबंधित अधिकारी आणि देवस्थान व्यवस्थापन समितीला करण्यात आली आहे, अशी माहितीही मंत्री शशिकला जोल्ले यांनी दिली आहे.