बेळगावच्या फास्ट ब्रॉडबँडची हाय स्पीड फायबर इंटरनेट सेवा आज शनिवारपासून कर्नाटकातील सर्व गावांमध्ये उपलब्ध केली जाणार असून तिचा शुभारंभ मुतगा (ता. जि. बेळगाव) गावातून होत आहे.
फास्ट ब्रॉडबँडचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार या हाय स्पीड फायबर इंटरनेट सेवेच्या शुभारंभामुळे फास्ट ब्रॉडबँड गावागावांमध्ये प्रवेश करणारी पहिली खाजगी इंटरनेट सेवा प्रदाता ठरली आहे. एकीकडे मोठ्या कंपन्या जास्तीत जास्त महसूल मिळवण्यासाठी शहरी भागावर लक्ष केंद्रित करत असताना स्वदेशी आयएसपी, फास्टने खऱ्या अर्थाने शक्य होईल तितक्या प्रत्येकापर्यंत इंटरनेट पोहोचावे यावर लक्ष केंद्रित केले आहे.
भारताची लोकसंख्या प्रामुख्याने ग्रामीण भागात वसली आहे. त्यांच्यासाठी फास्ट ब्रॉडबँडची हाय स्पीड फायबर इंटरनेट सेवा एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नसणार आहे. फास्ट फायबर इंटरनेट सुरू करत आहे आणि म्हणूनच कोणत्याही शहरी भागाप्रमाणे गावांमध्ये त्याच दर्जाची वेगवान सेवा मिळावी अशी एक अपेक्षा असते. त्यानुसार फास्ट ब्रॉडबँडच्या हाय स्पीड फायबर इंटरनेटद्वारे 30 एमबीपीएस ते थेट जीबीपीएस पर्यंतच्या वेगाची सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. हा वेग इंटरनेटवर घरातून केल्या जाणाऱ्या कामावर (वर्क फ्रॉम होम) आणि ऑनलाइन शिक्षणावर अवलंबून आहे. आता ग्रामीण भागात एखाद्याने आजपर्यंत स्वप्नातही कल्पना केली नसेल इतकी जास्तीत जास्त वेगाची 200 एमबीपीएस सेवा उपलब्ध झाली आहे.
ग्राम कनेक्ट मिशन अंतर्गत पहिल्या टप्प्यात सांबरा, बेळगुंदी, निलजी, रंगडोळ्ळी, बेळवट्टी, काकती, कुद्रेमनी, बेनकनहळ्ळी, मुतगा, होनगा, आंबेवाडी, मंडोळी, बेक्कीनकेरी, वाघवडे, तुरमुरी, बिजगर्णी, सुळगे (य.), मुचंडी बाळेकुंद्री (खुर्द), हिंडलगा, देसुर, उचगाव, पिरनवाडी, सुळगे, मच्छे, बाळेकुंद्री (बिके), येळ्ळूर, कलखांब आणि संतीबस्तवाड या गावांमध्ये आपली सेवा सुरू करण्याची फास्टची योजना आहे. दुसऱ्या टप्प्याला 2023 सालच्या पहिल्या पर्वात प्रारंभ केला जाण्याची शक्यता आहे.
या टप्प्यात बेळगाव जिल्ह्यातील प्रत्येक गावात (सुमारे 529 गावे) फास्ट ब्रॉडबँडची हाय स्पीड फायबर इंटरनेट सेवा उपलब्ध करण्याचे लक्ष्य आहे. तिसऱ्या टप्प्यात जो 2023 च्या दुसऱ्या पर्वात सुरू केला जाणार आहे, त्यामध्ये कर्नाटकातील सर्व गावांमध्ये (सुमारे 6,429) गावे ही सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.