बेळगावमध्ये नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीचे युद्धपातळीवर बृहत सर्वेक्षण करून 11234 शेतकऱ्यांना एकूण 17.01 कोटी रुपयांची नुकसान भरपाई वितरित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आज दिली.
गेल्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये बेळगाव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेत पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली. याची तात्काळ दखल घेत प्रशासनाच्या पाटबंधारे, कृषी आणि बागायत खात्याच्या अधिकाऱ्यांनी बृहत सर्वेक्षण मोहीम हाती घेऊन संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरेने नुकसान भरपाई मिळवून दिली आहे.
मुसळधार पावसाच्या तडाख्यामुळे जिल्ह्यातील विविध पिकांची मोठी हानी झाली आहे. याची गांभीर्याने दखल घेत बृहत सर्वेक्षण मोहीम हाती घेऊन संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या मार्गदर्शक सूचीनुसार नुकसान भरपाई जमा करण्यात आली आहे.
त्यामुळे उद्या बुधवारी शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम उपलब्ध होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. जिल्ह्यातील एकूण 11,234 शेतकऱ्यांच्या खात्यांवर एकूण 17 कोटी 1 लाख 1 हजार 195 रुपये इतकी नुकसान भरपाई जमा करण्यात आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.