गणेशोत्सव काळात एक माजी लोकप्रतिनिधी जनहितार्थ निर्माल्याची समस्या निवारण्याचा प्रयत्न करत असताना त्याला सहकार्य करण्याऐवजी आडकाठी करण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाकडून केला जात असल्याने गणेश भक्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गणेशोत्सव काळात निर्माल्य कुंडाची नितांत गरज असते. मात्र शहरात बहुतांश ठिकाणी दुर्दैवाने तशी व्यवस्था केली जात नाही. त्यामुळे गणेशोत्सव काळातील पूजा विधिनंतर निर्माल्य कोठेही फेकले जाते. हे टाळण्यासाठी अनुभवाचे माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी फिरते निर्माल्य कुंड ही संकल्पना राबवण्यास सुरुवात केली आहे.
गेले कांही वर्षे ते यशस्वीपणे आपला गणेश भक्तांच्या घरापर्यंत जाऊन निर्माल्य गोळा करण्याचा हा उपक्रम तडीस नेत आहेत. मात्र यावेळी निर्माल्याचा कचरा करू नका असे आवाहन करणाऱ्या महापालिकेच्या अधिकारी -कर्मचाऱ्यांकडून निर्माल्याची समस्या निकालात काढण्यास सहकार्य करणाऱ्या माजी नगरसेवक गुंजटकर यांच्या कार्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी गेल्या शनिवारपासून अनगोळ परिसरात फिरता निर्माल्य कुंड उपक्रम सुरू केला आहे. गेले दोन दिवस हा उपक्रम सुरळीत सुरू होता. या उपक्रमाद्वारे अनगोळ परिसरातील निर्माल्य जमा करून ते जक्कीनहोंड येथील महापालिकेच्या मुख्य निर्माल्य कुंडामध्ये जमा केले जात होते. तथापि आज मंगळवारी दुपारी अचानक अनगोळ परिसरातील निर्माल्य जक्कीनहोंड येथील मुख्य निर्माल्य कुंडात जमा करून घेण्यास तेथील कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतला.
तेंव्हा विनायक गुंजटकर यांच्या कार्यकर्त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना जाब विचारला असता. तुमचे निर्माल्य इथे टाकू नका त्याची तुमच्या भागातच विल्हेवाट लावा, असा सल्ला देण्यात आला. अखेर माजी नगरसेवक गुंजटकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची संपर्क साधल्यानंतर मुख्य निर्माल्य कुंडात अनगोळ परिसरातील निर्माल्य जमा करून घेण्यात आले.
सदर प्रकारामुळे उद्विग्न झालेल्या विनायक गुंजटकर यांनी यांनी बेळगाव लाईव्हशी बोलताना आम्ही जनहितार्थ निस्वार्थ कार्य करत आहोत गणेश भक्तांच्या घरापर्यंत जाऊन निर्माल्य गोळा केले जात आहे. तेंव्हा कृपया महापालिकेने आम्हाला या कामी सहकार्य करावे एवढीच आमची अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.