कॅम्प येथे अवजड वाहनाच्या अपघातात शाळकरी मुलाचा बळी गेल्यानंतर या मार्गावर अवजड वाहनांवर बंदी घालून रहदारी पोलीस नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी परिस्थितीत कोणताच बदल झालेला नसून वाहतूक नियंत्रणासाठी नागरिकांनाच रस्त्यावर उतरावे लागले आहे. कॅम्प येथील हॉटेल वेलकमचे मालक अब्दुल गफार शेख हे सध्या रहदारी पोलिसाची भूमिका पार पाडताना दिसत आहेत.
कॅम्प येथील फिश मार्केट नजीक दुपदरी खानापूर रोडवर ज्या ठिकाणी शाळकरी विद्यार्थ्यांचा बळी गेला होता. त्याच ठिकाणी शाळकरी मुलांच्या हितासाठी अब्दुल गफार शेख हातात ‘स्टॉप’चा इशारा देणारा फलक धरून रहदारी नियंत्रण करताना दिसत आहेत.
कॅम्प येथील हॉटेल वेलकमचे मालक असणारे शेख आपल्या व्यवसायातून वेळ काढून मुलांच्या शाळेच्या वेळेत विद्यार्थी- विद्यार्थिनींना सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यासाठी जातीने मदत करताना पहावयास मिळत आहेत. त्यांच्या या कार्याची वाहनचालकांसह कॅम्प परिसरात प्रशंसा होत असली तरी दुसरीकडे रहदारी पोलीस विभागाच्या ढिसाळ बेजबाबदार कार्यपद्धतीबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
रहदारी पोलीस हे वाहनचालकांसह नागरिक व शालेय विद्यार्थ्यांच्या जीविताच्या रक्षणासाठी आहेत? की फक्त दंडाच्या स्वरूपात पैसे उकळण्यासाठी आहेत? असा संतप्त सवालही केला जात आहे.
कॅम्प येथे शाळकरी मुलाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर केवळ आठ दिवसच रहदारी पोलिसांची नियुक्ती करण्यात आली त्यानंतर तो पोलीस गायब झाला. या ठिकाणी गतिरोधक घालण्यात आले असले तरी परिस्थितीत कोणताच बदल झालेला नाही. वाहनांची वर्दळ पूर्वीप्रमाणेच सुरू असून रस्ता ओलांडताना विद्यार्थ्यांना अडथळ्याचा सामना करावा लागत आहे.
विद्यार्थी रस्ता ओलांडत असल्याचे पाहूनही दुचाकी स्वारापासून अवजड वाहनचालकापर्यंत कोणीच आपली वाहने थोड्या वेळासाठी थांबवत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताचा धोका टळलेला नाही. ही परिस्थिती लक्षात घेऊन केवळ प्रशासनाला दोष न देता आणि पूर्णपणे प्रशासनावर विसंबून न राहता शाळकरी मुलांच्या सुरक्षतेसाठी वेलकम हॉटेलचे अब्दुल गफार शेख स्वतः रस्त्यावर उतरले आहेत.