स्मार्ट सिटी योजने अंतर्गत शहरातील बसथांब्यांचा कायापालट करण्यात आला आहे. शहरात प्रत्येक ठिकाणी हायटेक आणि स्मार्ट बसथांबे उभारण्यात आले असून बहुतांशी बसथांबे हे बस साठी नाही तर जनावरे, भिक्षुकांसाठी उपयोगी ठरत आहेत. शहरातील मध्यवर्ती भागातील कॉलेज रोड वरील बसथांब्याची देखील अशीच दुरवस्था सध्या पाहायला मिळत आहे.
कॉलेज रोड वरील अपोलो मेडिकल समोर असलेल्या बसथांब्याची मोठी दुरवस्था झालेली पाहायला मिळत आहे. या परिसरात अनेक शाळा – महाविद्यालये आहेत. शाळा महाविद्यालयाच्या वेळेत असंख्य विद्यार्थी याठिकाणी रस्त्यावर उभारलेले पाहायला मिळतात. या बस थांब्यामध्ये कोणतीही व्यवस्था नसल्याकारणाने तसेच जनावरे या बसथांब्यात आसरा घेण्यासाठी आत बसल्यामुळे सदर बसथांबा अस्वच्छ आहे.
चारीबाजूंनी पोस्टर्स, अस्वच्छता, रात्रीच्या वेळी लाईटची नसलेली व्यवस्था याचप्रमाणे बसथांब्यात नसलेली आसन व्यवस्था, बसथांब्यासमोर सातत्याने पार्किंग करण्यात येत असलेली चारचाकी वाहने यामुळे हा बसथांबा सध्या निरुपयोगी ठरला आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी शहरात अनेक ठिकाणी बसथांबे उभारण्यात आले आहेत. जुने बसथांबे हटवून त्यांचा कायापालट करून नवीन पद्धतीचे बसथांबे उभारण्यात आले आहेत. मात्र अनेक बसथांबे हे जनावरे, भिक्षुक, चारचाकी वाहनांचे पार्किंगचे ठिकाण बनले आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय तर होतच आहे मात्र स्मार्ट सिटी अंतर्गत खर्चण्यात आलेल्या पैशांवर देखील पाणी फेरले गेले आहे.
अनेक बसथांबे हे जाहिरातींनी रंगून गेले असून ज्यापद्धतीने स्मार्ट बसथांबे उभारण्यात आले आहेत यावर पूर्णपणे जाहिरातबाजी केल्याने बसथांब्याचा रंगीबेरंगी कायापालट होऊन प्रवाशांऐवजी जाहिरातदारांसाठी हे ठिकाणी सोयीचे ठरत आहे. या गैरसोयीची दखल संबंधित अधिकाऱ्यांनी घेऊन प्रवाशांची होणारी गैरसोय टाळावी, अशी मागणी होत आहे.