आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून पक्षांतर्गत नाराजी आणि असमाधान व्यक्त होत आहे. बेळगाव काँग्रेसमध्ये देखील इच्छुक उमेदवाराच्या नावावरून नाराजीचा सूर उमटत असून स्थानिकांना संधी न दिल्यास काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देऊन काँग्रेसला राम राम ठोकण्याचा इशारा दिला आहे.
दक्षिण ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष आणि विणकर नेते परशुराम ढगे यांच्या नेतृत्वाखाली आज बोलाविण्यात आलेल्या बैठकीत माजी आमदार रमेश कुडची आणि सरला सातपुते या दोन इच्छुक उमेदवारांच्या नावाच्या होत असलेल्या चर्चेबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली.
एका खाजगी वृत्त वाहिनीवरून उभयतांच्या नावाची चर्चा दक्षिण मतदारसंघातून इच्छुक उमेदवारांच्या दिशेने होत असल्याचे प्रसारित करण्यात आले. यानंतर काँग्रेसमधील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत असून स्थानिकांना संधी देण्याची मागणी करण्यात आली आहे.
काँग्रेसमधून दक्षिण मतदार संघासाठी मराठा समाजातील रमेश गोरल, विणकर समाजातील परशुराम ढगे लिंगायत समाजातील महांतेश कौजलगी यासारखे अनेक उमेदवार आहेत. अशा उमेदवारांना संधी दिल्यास आपण काम करू अन्यथा आपापल्या पदांचा राजीनामा देऊन काँग्रेसमधून बाहेर पडू असा इशारा या बैठकीत देण्यात आला. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच कार्यकर्ते पुढील निवडणुकीच्या तयारीला लागतात. मोर्चेबांधणी करतात. मात्र निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक उमेदवाराला संधी न देता बाहेरील उमेदवारांना संधी देऊन इतरांना डावलण्यात येते याबाबत या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली.
काँग्रेस पक्षातर्फे आगामी विधानसभा निवडणुक घडविण्यासाठी अनेक उमेदवार इच्छुक आहेत. यामध्ये काही बाहेरील उमेदवारांचाही समावेश असून ते निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे समजते. मात्र अशा लोकांना उमेदवारी न देता संघटनात्मक कार्य करणाऱ्या निष्ठावंत व प्रामाणिक उमेदवाराला आगामी विधानसभा निवडणुकीची उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांनी केली.
या मतदार संघातील उमेदवार जाहीर करण्यासंदर्भात केपीसीसी कार्याध्यक्ष आणि आमदार सतीश जारकीहोळी यांच्याशी चर्चा करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल, नगरसेवक खुर्शीद मुल्ला, आनंद शिरूर, भोजाप्पा हजेरी यांच्यासह बेळगाव दक्षिण मतदार संघातील काँग्रेसचे आजी-माजी लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते आणि हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते.