वन, अन्न, नागरीपुरवठा आणि ग्राहक व्यवहार मंत्री उमेश कत्ती यांचे मंगळवारी रात्री बंगळुरूमध्ये निधन झाले. त्यानंतर बुधवारी त्यांचे पार्थिव विशेष विमानातून बेळगावमध्ये आणण्यात आले. बेळगावमध्ये अंतिमदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले होते. यावेळी अंत्यसंस्कारासाठी मुख्यमंत्र्यांसह अनेक दिग्गज मंत्र्यांनी बेळगावमध्ये हजेरी लावली. बेल्लद बागेवाडी या उमेश कत्ती यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर लिंगायत धर्मविधीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर आज गुरुवारीदेखील अनेक मंत्रीमहोदय बेळगावमध्ये दाखल होत असून उमेश कत्ती यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन करीत आहेत.
आज भाजप राज्य प्रभारी अरुण सिंग यांनी बेळगावमध्ये कत्ती कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. सांबार विमानतळावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, उमेश कत्ती हे एक बिनधास्त असे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निधनामुळे भाजपसह राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. याचप्रमाणे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनीही उमेश कत्ती यांना बेळगावमध्ये श्रद्धांजली वाहिली असून उमेश कत्ती यांचे जाणे भाजपासाठी मोठे नुकसानदायक असल्याचे म्हटले. हिडकल जलाशयाच्या विकासाची इच्छा त्यांनी बोलून दाखविली होती. यानुसार मुख्यमंत्र्यांशी या विषयावर चर्चा करणार असल्याची माहिती डॉ. के. सुधाकर यांनी दिली.
याचप्रमाणे मंत्री एम. टी. बी. नागराज यांनीही उमेश कत्ती यांच्या निधनावर शोक व्यक्त करत उमेश कत्ती यांच्या राजकीय विचारधारेबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली. उमेश कत्ती यांची राजकीय विचारधारा अव्दितीय अशी होती. त्यांच्या निधनामुळे कधीही न भरून येणारी अशी हानी झाली आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मंत्री मुनिरत्न यांनीही उमेश कत्ती यांना श्रद्धांजली वाहताना त्यांचे जाणे हे वेदनायक असल्याचे सांगत शनिवारीच त्यांची वनविभागासंदर्भातील विषयावर चर्चा करण्यासाठी भेट घेतल्याचे सांगितले.
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रहलाद जोशी यांनी देखील कत्ती कुटुंबियांचे सांत्वन केले.यासह भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनीही त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी त्यांचे सुपुत्र निखिल कत्ती यांच्या नावे पत्राद्वारे संदेश पाठविला आहे. कत्ती कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असून कत्ती कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची ताकद मिळावी, अशी प्रार्थना केली आहे.