मंडोळी (ता. बेळगाव) गावानजीक शेतवाडीत आज गुरुवारी सकाळी बिबट्याचे दर्शन घडल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या जवळपास 28 दिवसांपासून बेळगाव कोर्स मैदान परिसरातील जंगलात वास्तव्य असलेल्या बिबट्याला पकडण्यात पोलीस व वनखात्याला अद्यापही यश आलेले नाही. निरनिराळ्या क्लुप्त्या अवलंबून देखील चलाख बिबट्या सर्वांना वारंवार गुंगारा देत आहे. शहराच्या सीमेवरील ग्रामीण परिसरात वावर असणारा हा बिबट्या आज पहाटे मंडोळी भागात पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.
मंडोळी गावातील एका शेतकऱ्याला आज गुरुवारी सकाळी तेथील मोरारजी देसाई रेसिडेन्शिअल स्कूल जवळच्या शेतजमिनीत बिबट्याचे दर्शन घडले आहे. नेहमीप्रमाणे भल्या सकाळी गवत आणण्यासाठी गेलेल्या या शेतकऱ्याला गावानजीकच्या धरणाजवळील शेतवाडीत बिबट्या वावरताना दिसला. तेंव्हा त्याने घाबरून हातातील काम टाकून लागलीच गावाकडे धाव घेतली.
तसेच गावातील पंचमंडळी आणि जबाबदार व्यक्तींना सदर प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर गावाजवळ बिबट्या आला असल्याची माहिती तात्काळ वनखात्याला कळविण्यात आली. दरम्यान बिबट्या आपल्या गावाजवळ पोहोचला आहे ही बातमी मंडोळी गावात वाऱ्यासारखी पसरताच सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बिबट्या बाबत माहिती मिळताच वन खात्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्वरेने मंडोळी गावाकडे धाव घेऊन संबंधित शेत जमिनीमध्ये बिबट्याची शोधाशोध करून त्याचा माग काढण्याचे काम हाती घेतले.
वन खात्याचे अधिकारी व कर्मचारी संबंधित ठिकाणी दाखल होताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. बिबट्या आढळल्याच्या पार्श्वभूमीवर मंडोळी आणि परिसरातील सर्व गावकऱ्यांना सतर्क राहण्याचे, तसेच बिबट्या पुन्हा आढळल्यास वनखाते अथवा ग्रामपंचायतीशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.