गणेशोत्सव काळात निर्माल्य कुंडाची गरज लक्षात घेऊन अनगोळचे माजी नगरसेवक विनायक गुंजेटकर यांनी कांही वर्षांपूर्वी सुरू केलेला फिरत्या निर्माल्य कुंडाचा आदर्शवत उपक्रम यंदाही सुरूच आहे. या उपक्रमाबद्दल गणेश भक्तांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
गणेशोत्सव काळात निर्माल्य कुंडाची नितांत गरज असते. देवाची भक्तीभावाने पूजन केल्यानंतर त्याला वाहिलेली फुले, तुळशीपत्र, दुर्वा तसेच केळीची पाने वगैरे निर्माण कोठे टाकायचा हा प्रश्न असतो.
बऱ्याचदा हे निर्माण कोठेही फेकले जाते. याची गांभीर्याने दखल घेत या निर्माल्याचे पावित्र्य जपण्याबरोबरच नागरिकांची सोय व्हावी यासाठी सात वर्षांपूर्वी तत्कालीन नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी स्वतःच्या प्रभागात फिरत्या निर्माल्य कुंड उपक्रमाला सुरुवात केली. तेंव्हापासून हा उपक्रम गणेशोत्सव काळात सातत्याने राबविला जात आहे.
यंदाच्या गणेशोत्सवासाठी शिवशक्तीनगर, अनगोळ येथील श्री सिद्धिविनायक मंदिर येथून नुकताच या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रथम मंदिरामध्ये श्री गणेशाची आरती झाली. त्यानंतर माजी नगरसेवक विनायक गुंजटकर दाम्पत्याच्या हस्ते निर्माल्य कुंड वाहनाचे पूजन करून उपक्रम सुरू करण्यात आला.
सदर फिरते निर्माल्य कुंड गणेशोत्सव काळात दररोज सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत अनगोळ परिसरात निर्माण जमा करणार आहे. याचा गणेश भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गुंजटकर यांनी केले आहे.