बेळगाव लाईव्ह/क्रीडादिनविशेष: सोशल मीडियाच्या जमान्यात हल्ली अनेक लहानगी व्हिडीओ गेम, कार्टून यासारख्या गोष्टींमध्ये अडकत चालली आहेत. मात्र काही सुजाण पालक आजही आपल्या मुलाच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या भविष्यासाठी झटत आहेत. मैदानी खेळ तर दूरच पण हल्लीची मुले घराबाहेर देखील सहसा खेळण्यासाठी जात नाहीत.
अलीकडे मुली, तरुणी, स्त्रिया यांच्यावरील वाढत चाललेल्या अत्याचाराच्या अनेक बातम्या आपण ऐकतो. त्यावर शोक व्यक्त करतो. मात्र आपल्या संरक्षणासाठी आपण काय केलं पाहिजे? कोणते धडे गिरविले पाहिजे? कोणते पाऊल उचलले पाहिजे याकडे अनेक स्त्रियांचे दुर्लक्षच होते. आपल्या मुलींना लहान वयातच स्वसंरक्षणाचे धडे दिले तर मुलींकडे कुणीही वाकड्या नजरेने पाहायला धजणार नाही. हाच विचार मनात घेऊन विजयनगर येथील चिमुरडी कुमारी वैष्णवी विष्णू मोरजकर हि कराटेचे धडे गिरवत आहे.
केवळ स्वरंरक्षणच नाही तर कराटेमधील आपले कौशल्य दाखवत अनेक स्पर्धांमधून अवघ्या १२ व्या वर्षातच ती अनेक पारितोषिकांची मानकरी ठरली आहे. अनेक क्रीडापटूंचे स्वप्न असलेल्या ऑलिम्पिकमध्येही या क्रीडाप्रकाराला विशेष महत्व आहे. एकीकडे जगण्याची, तर दुसरीकडे अस्तित्वाची लढाई अशाच प्रकारच्या या क्रीडाप्रकाराचे प्रशिक्षण वैभवी मोरजकर घेत आहे. सहाव्या इयत्तेत शिक्षण घेणारी वैभवी जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे. सध्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेची तयारी करणारी वैभवी हिला भरमाणी पाटील या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन मिळत आहे.
बेळगावमध्ये नुकत्याच झालेल्या कराटे स्पर्धेत वैभवीने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तसेच गोवा येथे झालेल्या स्पर्धेत देखील तिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. शाळेतील अनेक क्रीडा स्पर्धेत वैभवीचा उत्स्फूर्त सहभाग असतो. अनेक क्रीडाप्रकारात तिने पारितोषिकेही पटकाविली आहेत.
वैभवीला तिच्या पालकांकडून मोठे प्रोत्साहन मिळत असून अवघ्या १२ व्या वर्षातच कराटेचे धडे गिरविणारी वैभवी हि आजच्या अनेक मुलींसाठी रोल मॉडेल ठरावी, लहान वयातच स्वसंरक्षणाचे धडे देणाऱ्या कराटेसारख्या क्रीडाप्रकारात यश मिळविणाऱ्या वैभवीकडे पाहून प्रत्येक मुलीने सशक्त होण्याचा निर्धार करावा, हीच आजच्या क्रीडा दिनी अपेक्षा! वैभवीला तिच्या पुढील आयुष्यासाठी ‘टीम बेळगाव लाईव्ह’ कडून खूप साऱ्या शुभेच्छा!
*राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने….!*