समाज कल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांकडून जीविताला अपायकारक निकृष्ट दर्जाचे भोजन पुरवले जात असल्याचा आरोप करत पौष्टिक चांगले अन्न मिळावे या मागणीसाठी एपीएमसी नजीक असलेल्या डॉ. बी. आर. आंबेडकर अनुसूचित जाती -जमाती विद्यार्थी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी आज बुधवारी सकाळी तीव्र आंदोलन छेडले.
एपीएमसी नजीक असलेल्या डॉ. बी. आर. आंबेडकर अनुसूचित जाती -जमाती विद्यार्थी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना गेल्या अनेक महिन्यांपासून निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात आहे. वस्तीगृहातील जेवणाच्या पदार्थांमध्ये वारंवार मृत किडे, मुंग्या, झुरळं आढळून येत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी अनेक वेळा तक्रार करून देखील अधिकारी वर्गाकडून त्याची दखल घेतली जात नसल्याचे समजते.
वारंवार तक्रार करून देखील दखल घेतली जात असल्यामुळे वस्तीगृहातील संतप्त विद्यार्थ्यांनी आज बुधवारी जेवण खाण्यावर बहिष्कार टाकू ताटवाट्या वाजवत धरणे आंदोलन छेडले. यावेळी वुई वॉन्ट जस्टीस, बेके बेकू न्याया बेकू, समाज कल्याण अधिकाऱ्यांचा धिक्कार असो, जय भीम, जय वाल्मीकी आदी घोषणा देण्यात येत होत्या.
यावेळी बोलताना आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांचा नेता म्हणाला की, अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या आमच्या या डॉ. बी. आर. आंबेडकर वस्तीगृहात अत्यंत निकृष्ट प्रतीचे जेवण पुरविले जाते. या संदर्भात वेळोवेळी तक्रार करून देखील अधिकारीवर्गाकडून त्याची दखल घेतली जात नसल्यामुळे आमचे आरोग्य धोक्यात आले आहे. आम्हाला देण्यात येणारा आहार अतिशय हीन दर्जाचा असतो. आहार म्हणून आम्हाला अप्रत्यक्षरीत्या विशेष दिले जात आहे. आम्हाला देण्यात येणाऱ्या अन्नामध्ये मृत किडे, मुंग्या, झुरळे वरचेवर सापडतात. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होत आहे. या ठिकाणी पिण्याचे पाणी देखील चांगले मिळत नाही. विद्यार्थ्यांना अभ्यासाची पुस्तके मिळत नाहीत. एकंदर या वस्तीगृहात जवळपास सर्वच मूलभूत सुविधांचा अभाव आहे.
येथील अधिकारी अनुसूचित जातीजमातीच्या विद्यार्थ्यांना दुय्यम वागणूक देतात असे सांगून समाज कल्याण खात्याच्या मंत्र्यांनी याकडे तात्काळ गांभीर्याने लक्ष घालून आम्हाला न्याय मिळवून द्यावा. तसेच समाज कल्याण खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी, अन्यथा तेलंगणामध्ये विद्यार्थ्यांनी ज्याप्रमाणे तीव्र आंदोलन छेडले तसे राज्यव्यापी आंदोलन आम्ही छेडू, असा इशाराही संबंधित विद्यार्थ्यांने दिला.