बेळगावमध्ये पावसाचा जोर वाढला असून जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी खबरदारीचे पाऊल म्हणून आज सकाळी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली. अचानक जाहीर केलेल्या सुट्टीमुळे पालकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन गोंधळ उडाला.
शनिवारपासून जाधव नगर परिसरात बिबट्या शोध मोहीम सुरु झाली असून या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून या भागातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली होती. अशातच पावसाचा जोर कमी न झाल्याने खबरदारी म्हणून आज सकाळी सर्वच शाळांना सुट्टी देण्यात आली.
दरम्यान जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सुट्टीचा आदेश जाहीर करण्यास काहीसा विलंब केल्यानं अनेक विद्यार्थी आणि पालकांची दमछाक उडाली. काही शाळा सकाळच्या सत्रात लवकर सुरु होतात.
या अनुषंगाने अनेक विद्यार्थी शाळेत पोहोचले. काही विद्यार्थी रिक्षाने पोहोचले. मात्र अचानक सुट्टीचा आदेश देण्यात आल्याने पुन्हा पालकांना शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना आणावे लागण्याची वेळ आली.
शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा घरी परतावे लागले. अशातच आज पावसाचा जोरदेखील वाढला असून अनेक विद्यार्थी आणि पालकांना यामुळे त्रास सहन करावा लागला. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेसंदर्भातील आदेश वेळेवर जाहीर करावेत, अशी मागणी पालकातून होत होती.