उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने गेल्या बुधवारी रस्ता रुंदीकरण नुकसान भरपाई देण्याचा आदेश बजावल्यानंतर आरपीडी रस्ता रुंदीकरण प्रकरणी 47 लाख 49 हजार रुपये भरपाई देण्याचा निर्णय बेळगाव महापालिकेने घेतला आहे.
आरपीडी रस्ता रुंदीकरणामुळे नुकसान झालेल्या मिळकतींचे मूल्यमापन महापालिकेने केले होते. त्यानुसार भरपाईची रक्कम 55 लाख रुपये इतकी झाली होती. तथापि नव्या मूल्यमापनानुसार ही रक्कम 47 लाख 49 हजार रुपये झाली आहे. हे रक्कम उच्च न्यायालयात जमा केली जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. महापालिकेच्या विरोधात दाखल झालेल्या दाव्यावर अंतिम निर्णय झाल्यावर ती रक्कम याचिकाकर्त्यांना दिली जाणार आहे.
आरपीडी रस्ता रुंदीकरण प्रकरणी महापालिकेवर ओढवलेल्या या नामुश्किमुळे आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी संतापले आहेत. कायदा सल्लागारांसह संबंधित अधिकाऱ्यांसोबत ते सातत्याने बैठका घेऊन चर्चा करीत आहेत.
दरम्यान, गेल्या दहा वर्षात शहरात महापालिकेने अनेक रस्त्यांचे रुंदीकरण केले आहे. परंतु त्यात ज्यांच्या मिळकतींचे नुकसान झाले त्यांना भरपाई दिली गेलेली नाही.
आता आरपीडी रस्ता रुंदीकरण प्रकरणी भरपाई आदेशानंतर शहरातील अन्य रस्त्यांच्या रुंदीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. त्या रुंदीकरणाच्या विरोधात न्यायालयात ज्यांनी याचिका दाखल केली आहे, त्यांनी भरपाईसाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला आहे.