अखेर महापौर आणि उपमहापौर निवडीचे आरक्षण जाहीर झाले असून बेळगाव महानगरपालिकेची प्रतीक्षा आता संपली आहे. एक वर्षाचा कालावधी उलटला तरी महापौर आणि उपमहापौर निवडीचे भिजते घोंगडे तसेच असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत होती. मात्र आता आरक्षण जाहीर झाल्यामुळे महापौर आणि उपमहापौर निवडीचा मार्ग मोकळा झाला असून महापौर ‘सामान्य वर्ग’ तर उपमहापौर ‘अनुसूचित जाती महिला’ प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.
राज्याच्या नगरविकास खात्याने सदर महापौर, उपमहापौर निवडीचे आरक्षण जाहीर केले आहे. राज्यातील 10 महानगरपालिकेच्या महापौर -उपमहापौर निवडीचे आरक्षण जाहीर झाले असून नगर विकास खात्याचे टी. मंजुनाथ यांनी बुधवारी महानगरपालिकेच्या या आरक्षणाची घोषणा केली आहे. त्यानुसार बेळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदाचे आरक्षण ‘सामान्य वर्ग’ तर उपमहापौरपदाचे ‘अनुसूचित जाती महिला’ असे आरक्षण जाहिर झाले आहे.
राज्यातील बेळळरी, बेळगाव, विजापूर, कलबुर्गी, तुमकुर, हुबळी, धारवाड, म्हैसूर, मंगळूर आणि दावणगिरी या दहा नगरपालिकेंचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. बेळगाव महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन एक वर्षाचा कालावधी झाला आहे. मात्र अजूनही महापौर, उपमहापौर निवडणूक झालेली नाही. याखेरीज नगरसेवकांचा शपथविधी देखील पार पडलेला नाही.
परिणामी आपल्या वॉर्ड मधील समस्या सोडविण्याबरोबरच विविध विकास कामे राबविताना नगरसेवकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. यासाठी तात्काळ महापौर व महापौर निवडून विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, अशी मागणी सातत्याने नगरसेवक तसेच नागरिकांकडून करण्यात येत होती. अखेर आज बुधवारी नगर विकास खात्याने महापौर, उपमहापौर निवडणुकीचे आरक्षण जाहीर केल्यामुळे आता बेळगाव महानगरपालिकेचा महापौर आणि उपमहापौर कोण होणार? याबाबतची उत्सुकता वाढू लागली आहे.
एकंदर या निवडणुकीमुळे आता मनपाचा कार्यभार सुरळीत सूरू होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, मागील वर्षे देखील केवळ आरक्षण जाहीर झाले होते. मात्र महापौर व उपमहापौर निवडणूक झाली नव्हती. आता या वर्षी देखील आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे यावेळी तरी महापौर निवडणूक व्हायला हवी असं मत काहींनी व्यक्त केले आहे.