गेल्या पंधरा दिवसांपासून बेळगावमध्ये पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. गेल्या आठवड्याभरात एकाच दिवशी तिन्ही ऋतूंचा अनुभव देखील बेळगावकरांना घेता आला.
सकाळी ढगाळ वातावरण, दुपारी कडक ऊन आणि सायंकाळी अचानकपणे येणारा पाऊस यामुळे श्रावण महिन्याचा भास आषाढीतच बेळगावकरांना आला.
मात्र बुधवारी दुपारी ३ च्या दरम्यान बेळगावमधील काही परिसरात धुव्वाधार पावसाने एंट्री केली असून अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.
गेल्या पंधरवड्यात थांबलेल्या पावसामुळे अनेक नागरिक घराबाहेर पडले होते. श्रावण महिन्यामुळे अनेक धार्मिक कार्यक्रमांची असलेली रेलचेल, सणासुदीचे दिवस आणि यासाठी खरेदी करण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची पावसामुळे मोठी तारांबळ उडाली.
अचानक सुरु झालेल्या पावसाने तब्बल अर्ध्या तासानंतर काहीशी विश्रांती घेतली. वळिवाच्या पावसाप्रमाणे ढगांच्या गडगडाटासह शहराच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस पडला आहे.