मराठी भाषिक लोकांची दडपशाही ही बेळगावात सातत्याने होतच असते. उचगाव स्वागत कमानी वरील मराठी अक्षरे हटवून कन्नड अक्षरे लिहा असा आग्रह धरणाऱ्या प्रशासनाला विरोध करणाऱ्या समितीचे सात नेते आणि कार्यकर्त्यांना पोलीस उपायुक्तांकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.यामुळे स्वागतकमानी वरून मराठी भाषिकांना वेठीस धरण्याचा हा प्रयत्न केला जात आहे असा आरोप केला जात आहे.
पोलीस प्रशासनानेच 21 जुलै रोजी गावात स्वागत कमानी बाबत बैठक बोलावली होती. त्याच बैठकीत भाषिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याबद्दल कारवाई अशा आशयाची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यामुळे मते मांडण्यासाठी मराठी भाषकांची बैठक बोलावणाऱ्या प्रशासनाने मते मांडल्यानंतर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उघडला आहे. यामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशा प्रकारची भूमिका असल्याची टीका होत आहे.
हा प्रकार म्हणजे हिटलरशाही स्वरूपाचा असून पोलिसांनी माजी ता.प अध्यक्ष लक्ष्मण सदबा होनगेकर,बाळासाहेब देसाई ग्रामपंचायत सदस्य बळवंत उर्फ बंटी पावशे,लक्ष्मण लाळगे, भागोजी पाटील,शरद भरमा होनगेकर आणि दीपक गडकरी यांना नोटीस बजावली आहे. मात्र अधिकृत प्रत देण्यात आलेली नाही केवळ तोंडी सूचना देण्यात आल्या आहेत. लेखी नोटीस देण्यात आली नसून आम्ही काय उत्तर देणार असे म्हणत या नोटिसीला उत्तर देण्यासाठी एकही कार्यकर्ते पोलीस स्थानकात दाखल झालेले नाही.
काही वर्षांपूर्वी उचगावच्या वेशीमध्ये स्वागत कमान उभारण्यात आलेली आहे.कमानीवर मराठी आणि कन्नड दोन्ही भाषेत मळेकरनी देवस्थान उचगाव ग्रामस्थांकडून सहर्ष स्वागत अशा आशयाचा मजकूर आहे. मात्र मराठी अक्षरे मोठी आणि कन्नड अक्षरे लहान असल्याचे निमित्त करून काही संघटनांनी मराठी अक्षरेच काढून टाकण्याची मागणी केली होती.
लोकशाहीच्या माध्यमातून घटनेने दिलेला अधिकारांनुसार व्यक्त होणे हा अधिकार आहे त्यानुसार प्रशासनाने बैठक बोलून व्यक्त व्हा असे सांगितले असताना व्यक्त झाल्यानंतर नोटीसी देणे याचा अर्थ काय असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
त्यानंतर स्वागत कमानी वरील मराठी अक्षरे लहान करावीत कन्नड अक्षरे मोठी करावीत असा आदेश जिल्हा प्रशासनाने देऊन ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच सदस्यांची ग्रामपंचायत बैठक घेण्यात आली .त्यावेळी त्यांनी मराठी अक्षरे लहान करणाऱ्याला गावातून विरोध असून गावकऱ्यांची बैठक घेऊन सूचना करण्याची मागणी केली होती.
त्यानुसार प्रशासनाने गेल्या ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांची बैठक बोलावली होती पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मराठी भाषिकांनी आपली मते परखडपणे मांडली होती आणि कन्नड अक्षरे मोठी लिहिण्यास नकार दर्शवला होता. शिवाय पहिल्यांदा सीमा भागातील सरकारी कार्यावरील फलक मराठी आणि कन्नड या दोन्ही भाषेत उभारा त्यानंतरच स्वागत कमानीवरचा आग्रह धरा अशी भूमिका घेतलेली होती. यामुळे संतापलेल्या प्रशासनाने आता महिनाभराने नोटीस बजावली आहे.